अहमदाबाद : विश्वचषक 5 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. भारत विश्वकप जिंकण्याचा पक्का दावेदार आहे. त्यामुळं क्रिकेट प्रेमींना 2011 विश्वकपची पुनरावृत्ती होण्याची अपेक्षा आहे. स्पर्धेपूर्वी, संघ संयोजन तसंच केएल राहुल विकेटकीपरचे ग्लोव्हज घालणार की नाही, याबद्दल बरीच चर्चा झाली आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू होणाऱ्या विश्वचषकासाठी भारतीय निवड समितीनं देशांतर्गत क्रिकेटमध्ये झारखंडचं प्रतिनिधित्व करणारा युवा यष्टीरक्षक फलंदाज इशान किशनचा समावेश केला आहे.
इशान किशनला यष्टीरक्षणासाठी पाठिंबा : भारताचा माजी यष्टीरक्षक नयन मोंगियानं इशान किशनला यष्टीरक्षणासाठी पाठिंबा दिला आहे. तसंच, रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघानं एका वेळी एकाच सामन्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे, तसंच अपेक्षांचं कोणतेही दडपण घेऊ नये असा सल्लाही मोंगिया यांनी दिला. "भारताकडं एक नियमित यष्टीरक्षक असला पाहिजे. मी या भूमिकेसाठी इशान किशनला प्राधान्य देईन. कारण त्यामुळं गोलंदाजांचा आत्मविश्वास वाढेल. इशान किशन हा उत्तम डावखुरा फलंदाज आहे. इशान किशन आणि केएल राहुल संघ संकटाच्या वेळी मदत करेल,” असं मोंगिया यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितलं.
घरच्या मैदानाचा फायदा होणार : "या सामन्यात प्रत्येकाची भूमिका महत्त्वाची आहे. संघात आक्रमक फलंदाज, अष्टपैलू तसंच दर्जेदार गोलंदाजांचा समावेश आहे. भारतीय संघानं एकावेळी एकच सामना खेळायला हवा. त्यांच्यावर असलेल्या अपेक्षांचं दडपण संघानं घेऊ नये, असं नयन मोंगिया यांनी म्हटलं आहे. भारताच्या विश्वचषक जिंकण्याच्या संधींबद्दल विचार करताना, 53 वर्षीय मोंगिया यांनी सांगितलं की, आता विश्वचषकातील दुष्काळ संपवण्याची संधी आपण गवमता कामा नये. "भारत घरच्या मैदानावर खेळणार आहे. त्यामुळं पुरेपुर फायदा होण्याची शक्यता आहे. भारत यावेळी विजेतेपद पटकावण्यासाठी जय्यत तयारी करत आहे." असं त्यांनी म्हटलं आहे. 2011 नंतर प्रथमच विश्वचषक जिंकण्यासाठी भारत पूर्ण प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
भारत-पाकिस्तान सामन्याला “युद्ध” मानू नये : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर 14 ऑक्टोबरला होणाऱ्या बहुप्रतीक्षित भारत-पाकिस्तान लढतीबद्दल बोलताना मोंगिया म्हणाले की, चाहत्यांनी भारत-पाकिस्तान सामन्याला “युद्ध” मानू नये, क्रिकेट हा एक खेळ आहे, त्याकडं खेळाच्या दृष्टीनं पाहावं असं त्यांनी सांगितलं. "भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना नेहमीच चांगला होता. लोकांनी याकडं सामान्य स्पर्धा म्हणून पाहावं. तसंच, खेळाडूंना दोन सामन्यांमध्ये विश्रांतीसाठी भरपूर वेळ मिळेल. तसंच हवामानाचा विचार करता खेळाडूंना थकवा येणार नाही. सांघिक संयोजनाबद्दल बोलताना नयन मोंगियानं भारताच्या फिरकी पटूंच कौतुक केलंय. संघाच्या विजयात फिरकीपटू महत्त्वाची भूमिका बजावेल, असं त्यांनी म्हटलं आहे. "रविचंद्रन अश्विन (स्पिनर), कुलदीप यादव, रवींद्र जडेजा हे त्रिकूट संघाला विजय मिळवण्याच्या दिशेनं नक्की प्रयत्न करतील. त्यांचा भारतीय खेळपट्टीवरचा अनुभव पाहाता प्रतिस्पर्ध्यांना विजयपासून रोखता येईल". असं मोंगिया यांनी म्हटलंय.
हेही वाचा -
- Cricket World Cup 2023 : हे आहे भारतातील सर्वात आधुनिक क्रिकेट स्टेडियम, कितीही पाऊस आला तरी मॅच होणार नाही रद्द!
- Cricket World Cup 2023 : 'भारत उपांत्य फेरीत नक्कीच प्रवेश करणार', किरण मोरेंची भविष्यवाणी
- Cricket World Cup 2023 : सलग दोन विश्वचषकात फायनलमध्ये पराभव, आता तरी न्यूझीलंडचा ट्रॉफीचा दुष्काळ संपणार का?