लॉर्ड्स - आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेचा महाअंतिम सामना आज लॉर्ड्सवर रंगणार आहे. कारकिर्दीतील पहिलाच विश्वचषक काबीज करण्यासाठी इंग्लंड आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ आपापसात भिडणार आहेत. त्यामुळे यंदाच्या विश्वचषक स्पर्धेच्या शेवटच्या सामन्याचा थरार चाहत्यांना अनुभवता येणार आहे. हा सामना दुपारी 3 वाजता सुरु होईल.
यजमान इंग्लंडने उपांत्य सामन्यामध्ये गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला पराभवाचा धक्का दिला. ऑस्ट्रेलियाचे 224 धावांचे आव्हान घेऊन उतरलेल्या इंग्लंडचे सलामीवीर जॉनी बेअरस्टो आणि जेसन रॉय यांनी आक्रमक फलंदाजी केली. या सामन्यात इंग्लंडने सांघिक कामगिरीचे जबरदस्त प्रदर्शन घडवत कट्टर प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलियाला 8 गडी राखून सहज नमवले. त्यामुळे असाच धक्का न्यूझीलंडला देत घरच्या मैदानावर पहिला विश्वचषक उंचावण्यासाठी इंग्लंडचा संघ आतुर झाला आहे.
दुसरीकडे, न्यूझीलंडने गुणतालिकेत अव्वल असणाऱ्या भारताला हरवत सर्वांना आश्चर्यचकित केले होते. शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या व उत्कंठावर्धक ठरलेल्या विश्वकरंडक स्पर्धेतील पहिल्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंडने भारताचा १८ धावांनी पराभव करत दिमाखात फायनलचे तिकीट मिळवले. याआधी स्पर्धेतील उपांत्य फेरीसाठी आवश्यक असलेल्या सामन्यात इंग्लडने न्यूझीलंडवर ११९ धावांनी दणदणीत विजय मिळवला होता. त्यामुळे या पराभवाचा वचपा न्यूझीलंड काढणार का याची चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली आहे, शिवाय, 2015 ची विश्वकरंडक स्पर्धा जिंकण्याचे न्यूझीलंडचे स्वप्न ऑस्ट्रेलियाने धूळीस मिळवले होते. त्यामुळे न्यूझीलंड संघाला परत एकदा विश्वविजेता होण्याची संधी चालून आली आहे.
दोन्ही संघ -
- इंग्लंड - ईऑन मॉर्गन (कर्णधार), मोईन अली, जोफ्रा आर्चर, जॉनी बेअरस्टो, जॉस बटलर, टॉम करन, लियाम डॉसन, लियाम प्लंकेट, आदिल रशीद, जो रूट, जेसन रॉय, बेन स्टोक्स, जेम्स विन्स, ख्रिस वोक्स, मार्क वूड.
- न्यूझीलंड - केन विल्यमसन (कर्णधार), मार्टिन गुप्टील, रॉस टेलर, ट्रेंट बोल्ट, डी ग्रँडहोमे, लॉकी फर्ग्यूसन, मॅट हेन्री, टॉम लॅथम, कॉलिन मुनरो, जिमी निशाम, हेन्री निकोलस, मिशेल सँटेनर, ईश सोधी, टीम साऊदी, टॉम ब्लंडेल.