चेन्नई - भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेला उद्यापासून (ता.५) सुरूवात होणार आहे. चेन्नई येथे होणाऱ्या पहिल्या सामन्यात भारताच्या सलामीची धुरा कोणत्या खेळाडूंकडे असणार, याची माहिती खुद्द कर्णधार विराट कोहलीने दिली आहे.
विराट कोहलीने आज व्हर्चुअल पत्रकार परिषदेत सांगितले की, 'युवा फलंदाज शुबमन गिलसोबत अनुभवी फलंदाज रोहित शर्मा सलामीला येईल. कसोटी क्रिकेटमध्ये आश्वासक सुरूवातीची आवश्यकता असते. आम्हाला अशीच सुरूवात या जोडीकडून आपेक्षित आहे.'
दरम्यान, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुबमन गिल आणि रोहित शर्मा या जोडीनेच भारताच्या डावाला सुरूवात केली होती. यात शुबमनने ५१.९ च्या सरासरीने २५९ धावा केल्या. यात २ अर्धशतकांचा समावेश आहे.
भारतीय संघाने चेन्नईमध्ये आतापर्यंत ३२ कसोटी सामने खेळली आहेत. यात १४ सामन्यात विजय मिळवला आहे. तर ६ सामन्यात भारताला पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे. राहिलेले ११ सामने अनिर्णीत राहिले आहेत.
भारत आणि इंग्लंड यांच्यात चार सामन्याची कसोटी मालिका खेळवली जात आहे. यातील पहिले दोन सामने चेन्नईत तर राहिलेले दोन सामने अहमदाबादमध्ये होणार आहेत.
हेही वाचा - Ind vs Eng : पाहुण्या संघाला जबर धक्का; पहिल्या २ कसोटीतून बाहेर पडला सलामीवीर
हेही वाचा - IND VS ENG : जो रूट म्हणतो, विराट नव्हे तर 'या' खेळाडूची विकेट आमच्यासाठी महत्वाची