मुंबई - आयपीएलचा आगामी हंगाम २३ मार्चपासून सुरू होत आहे. आयपीएलनंतर काही दिवसांनी विश्वकरंडकाची सुरुवात होणार आहे. त्यामुळे खेळाडूंवर अति क्रिकेटचा भार पडून कामगिरीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. विराट कोहलीनेही ऑक्टोबर २०१८ ला विश्वकरंडकाला डोळ्यासमोर ठेवून आयपीएलमध्ये खेळाडूंना विश्रांती देण्याविषयी टिप्पणी केली होती.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार स्थापित प्रशासन समितीचे (सीओए) प्रमुख विनोद राय यांनी आयपीएलमध्ये खेळाडूंना आराम देण्याच्या मुद्यावर बोलताना स्पष्ट केले, की बीसीसीआय या मुद्द्यावर लक्ष ठेवून आहे. फ्रँचायझींशी योग्यवेळी चर्चा केली जाईल. आमची टीम सुद्धा याबाबत लक्ष ठेवून आहे. यानंतर योग्य तो निर्णय घेण्यात येईल.
भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याबाबत बोलताना म्हणाला, की आयपीएलमध्ये न खेळवून खेळाडूंना आराम द्यावा, यासाठी मला कोणतेही कारण सापडत नाही. ४ षटके गोलंदाजी केल्याने तुम्ही थकणार नाहीत. तुम्ही या षटकांमध्ये यॉर्करसोबतच गोलंदाजीत विविध प्रयोग करू शकता. तुम्हाला दबावात खेळण्याचा अनुभव मिळेल. गोलंदाज पूर्ण आयपीएल खेळू शकतो. त्यांनी फक्त खाण्यावर आणि त्यांच्या आरामावर व्यवस्थित लक्ष दिले पाहिजे.
आयपीएलमध्ये खेळाडूंना विश्रांती देण्याबाबतचा निर्णय हैदराबाद येथे विंडीज विरुद्ध झालेल्या एकदिवसीय सामन्यानंतर चर्चेला आला होता. त्यावेळी या मुद्द्यावर कोणताही निर्णय झाला नव्हता. परंतु, यामुळे फ्रँचायझी आणि खेळाडूंमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली होती. दोघांनीही बीसीसीआयसोबत अशाप्रकारची कोणतीही बोलणी केली नसल्याचे स्पष्ट केले होते.