हैदराबाद - भारतीय जलदगती गोलंदाज उमेश यादव पिता बनला आहे. उमेश यादवने ट्विट करून ही माहिती दिली आहे. उमेश यादवने सोशल मीडियावर लिहिले आहे, की छोटी परी तुझे या जगात स्वागत आहे. मी खूपच आनंदित आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या कसोटीसाठी दुखापतग्रस्त उमेश यादव याच्या जागी टी नटराजन किंवा शार्दुल ठाकूर याला संधी मिळू शकते. सुत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार जखमी उमेश यादव चौथा कसोटी सामनाही खेळू शकणार नाही व तो मायदेशी परत आला आहे. तिसरा कसोटी सामना सात जानेवारीपासून सिडनीमध्ये खेळला जाणार आहे. बोर्डाच्या सूत्रांनी सांगितले, की टी नटराजनच्या प्रदर्शनाने सर्वजण प्रभावित आहेत. परंतु त्याने आतापर्यंत तामिळनाडुकडून केवळ एकमेव प्रथम श्रेणी सामना खेळला आहे. दुसरीकडे शार्दुलने मुंबईकडून अनेक स्पर्धा खेळल्या आहेत.
दरम्यान भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीही पिता बनणार आहे. त्यामुळे त्यानेही पॅटरनिटी लीव घेतली आहे. कोहली ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पहिला कसोटी सामना खेळून भारतात परतणे पसंत केले होते.
कोहलीच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणेकडे कर्णधारपदाची धुरा सोपविण्यात आली आहे. पहिला कसोटी सामना हरल्यानंतर भारतीय संघाचे प्रदर्शन उंचावत दुसऱ्या कसोटीत यजमानांना आठ विकेट्सने पराभूत केले. भारताचा प्रभारी कर्णधार रहाणेने मेलबर्न टेस्टच्या पहिल्या डावात ११२ धावांची आकर्षक खेळी केली होती. रहाणेला सामनावीरचा पुरस्कार मिळाला होता.