नवी दिल्ली - आरएसएसशी संबंधित स्वदेशी जागरण मंचने बीसीसीआयवर देशाचा अपमान केल्याचा आरोप केला आहे. बीसीसीआयने चीनी कंपनीबरोबर प्रायोजकत्व राखून ठेवत देशाचा अपमान केला आहे. लोकांनी या टी-20 लीगवर बहिष्कार टाकला पाहिजे, असे या संघटनेने म्हटले आहे.
स्वदेशी जागरण मंचचे सह-संयोजक अश्विनी महाजन म्हणाले, ''भारतीय क्रिकेट बोर्डाने आणि आयपीएलच्या संचालन समितीने चीनी सैनिकांशी झालेल्या चकमकीत शहीद झालेल्या भारतीय सैनिकांचा अनादर केला आहे. जेव्हा देश अर्थव्यवस्थेला चीनी वर्चस्वापासून मुक्त करण्यासाठी प्रयत्नशील आहे. अशा परिस्थितीत आयपीएलचा निर्णय जनहिताच्या विरोधात आहे.''
ते म्हणाले, ''लोकांनी या क्रिकेट लीगवर बहिष्कार घालण्याचा विचार केला पाहिजे. देशाची सुरक्षा आणि सन्मानाशिवाय दुसरे काही महत्वाचे नाही.''
यंदाच्या आयपीएलसाठी मुख्य प्रायोजक म्हणून विवो कायम राहणार आहे. रविवारी पार पडलेल्या आयपीएलच्या गव्हर्निंग काऊन्सिलच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. भारत आणि चीन यांच्यात सध्या वाद सुरू आहे. परंतु कायदेशीर संघाशी सल्लामसलत करून आणि प्रायोजक करार डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेण्यात आला आहे.
विवो कंपनी बीसीसीआयला मुख्य प्रायोजकत्वासाठी दरवर्षी 440 कोटी रुपये देते. विवोने 2018 मध्ये 2199 कोटींसह पाच वर्षांसाठी करार केला होता. हा करार 2022 मध्ये संपुष्टात येईल.