मुंबई - इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघात सूर्यकुमार यादवला स्थान देण्यात आले आहे. भारतीय संघात निवड झाल्यानंतर सूर्यकुमार यादवने एक ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
बीसीसीआयने इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी १९ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. भारतीय संघ १२ मार्चपासून इंग्लंडविरुद्ध ५ सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी १९ सदस्यीय भारतीय संघात सूर्यकुमार यादवलाही स्थान देण्यात आले आहे. भारतीय संघात निवड झाल्यानंतर सूर्यकुमार यादवने डी. वाय. पाटील स्टेडियमच्या मैदानात बसलेला एक फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत त्याने, ही अद्भूत भावना आहे, अशा आशयाचे कॅप्शन देत आपल्या भावना व्यक्त केली आहे.
सूर्यकुमारच्या या ट्विटनंतर, त्यांच्या चाहत्यांनी त्याचे अभिनंदन केले आहे. दरम्यान, सूर्यकुमार यादव मागील अनेक महिन्यांपासून भारतीय संघाचे दरवाजे ठोठावत होता. चाहत्यांसह काही दिग्गजांनी सूर्यकुमारला भारतीय संघात संधी मिळावी अशी मागणी केली होती. पण त्याला संधी मिळत नव्हती. आता त्याला अखेर भारतीय संघात खेळण्याची संधी मिळाली असून त्याचे स्वप्न पूर्ण होत आहे.
सूर्यकुमार यादवने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ७७ सामन्यात ४४ च्या सरासरीने ५ हजार ३२६ धावा केल्या आहेत. तर आयपीएलमध्ये १०१ सामने खेळलेल्या सूर्यकुमारच्या नावे ३०.२० च्या सरासरीने २ हजार २४ धावा आहेत.
असा आहे टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ -
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), युझवेंद्र चहल, वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, राहुल तेवतिया, टी नटराजन, भुवनेश्वर कुमार, दिपक चहार, नवदीप सैनी आणि शार्दुल ठाकूर.
हेही वाचा - आयपीएलमुळे आगामी कसोटी मालिकेच्या तयारीवर परिणाम नाही : पुजारा
हेही वाचा - 'अहमदाबाद तयार रहा', चहलची पत्नी धनश्रीचा बॉलिंग आणि बॅटिंगच्या हावभावासह भन्नाट डान्स, पाहा व्हिडिओ