जयपूर - महिलांच्या आयपीएल म्हणजेच 'वुमन्स टी २० चॅलेंज' स्पर्धेत आज (गुरुवारी) खेळल्या गेलेल्या तिसऱ्या सामन्यात सुपरनोव्हास संघाने व्हेलॉसिटीवर १२ धावांनी मिळवला विजय मिळवला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना सुपरनोव्हासच्या संघाने जेमिमा रॉड्रीग्जच्या ७७ धावांच्या शानदार खेळीच्या जोरावर ३ बाद १४२ धावा उभारल्या होत्या.
सुपरनोव्हासने दिलेल्या १४३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना व्हेलॉसिटीचा संघ निर्धारीत २० षटकांमध्ये १३० धावा करु शकल्याने १२ धावांनी पराभवास सामोरे जावे लागले. व्हेलॉसिटीकडून डॅनीएला वॅटने ४३, कर्णधार मिताली राजने ४० तर वेदा कृष्णमूर्तीने ३० धावा केल्या.
आयपीएलच्या धर्तीवर बीसीसीआयकडून महिला क्रिकेटपटूंसाठी 'वुमन्स टी २० चॅलेंज' ही स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेत सुपरनोव्हाज, ट्रेलब्लेझर्स आणि व्हेलॉसिटी अशा ३ संघांचा समावेश करण्यात आला आहे. तीन्ही संघाकडे प्रत्येकी २ गुण आहेत. मात्र सुपरनोव्हास आणि व्हेलॉसिटी नेट रन रेट जास्त असल्याने गुणतालिकेत त्यांना अनुक्रमे पहिले आणि दुसरे स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे या स्पर्धेची अंतिम फेरी सुपरनोव्हास आणि व्हेलॉसिटी यांच्यात ११'मे'ला खेळणयात येणार आहे. तर ट्रेलब्लेझर्स स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.