मुंबई - चेंडू छेडछाड प्रकरणी १ वर्ष बंदीची शिक्षा भोगत असलेला ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर मार्च महिन्याच्या अखेरीस ऑस्ट्रेलियाच्या संघात माघारी परतणार आहेत. २८ मार्चला स्मिथ आणि वॉर्नरची एका वर्षाची बंदी संपत आहे. शेवटच्या २ एकदिवसीय सामन्यांसाठी दोघांना संघात बोलवण्यात आले आहे.
पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात २२ मार्चपासून ५ एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरू होत आहे. ऑस्ट्रेलियाने याआधीच मालिकेसाठी संघ जाहिर केला होता. परंतु, संघ जाहीर करताना दोघांनाही वगळण्यात आले होते. आता व्यवस्थापनाने दोघांनाही २०१९ च्या विश्वकरंडकाच्या तयारीसाठी शेवटच्या २ एकदिवसीय सामन्यांसाठी संघात घेतले आहे.
स्टीव्ह स्मिथ संघात परतला असला तरी, संघाचे कर्णधारपद हे सध्याचा कर्णधार अॅरोन फिंच याच्याकडेच राहणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघात खेळण्यापूर्वी २३ मार्चपासून सुरू होणाऱया आयपीएल स्पर्धेत दोघेही खेळणार आहेत, असेही क्रिकेट ऑस्ट्रेलियाने स्पष्ट केले आहे. डेव्हिड वॉर्नर सध्या चांगला फॉर्मात असून त्याने ऑस्ट्रेलियाच्या स्थानिक क्रिकेट स्पर्धेत शतक ठोकले आहे.