कोलंबो - न्यूझीलंडचा संघ सध्या श्रीलंकेच्या दौऱ्यावर आहे. किवींजचा संघ २ सामन्याची कसोटी मालिकेनंतर लंकेविरुध्द टी-२० मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी लंकेने आपला १५ खेळाडूंचा संभाव्य संघ जाहीर केला आहे. यामध्ये संघाचे कर्णधारपद नुकतेच एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा याच्याकडे सोपविण्यात आली आहे.
न्यूझीलंड विरुध्द श्रीलंका यांच्यामध्ये टी-२० मालिका होणार असून या मालिकेतील पहिला सामना १ सप्टेंबरला होणार आहे. श्रीलंका निवड समितीने जाहीर केलेल्या संघामध्ये युवा आणि अनुभवी खेळाडूंचा समतोल दिसून येत आहे.
श्रीलंकेची फलंदाजीची कमान अनुभवी फलंदाज कुशल मेंडिस, कुसल परेरा तर युवांमध्ये धनुषा गुणाथिलाका आणि निरोशन डिकवेला यांच्यावर असेल. तर गोलंदाजीत कर्णधार लसिथ मलिंगासह इसुरु उडाना, कुशन रजिथा आणि लाहिरु कुमारा भूमिका बजावतील. निवड समितीने मात्र, अनुभवी थिसारा परेला याला संघात स्थान दिलेले नाही.
श्रीलंकेचा संघ -
लसिथ मलिंगा (कप्तान), निरोशन डिकवेल्ला, अविष्का फर्नाडो, कुशल परेरा, धनुषा गुणाथिलाका, कुशल मेंडिस, सेहान जयसूर्या, दसुन शनाका, वाहिदू हसरंगा, लाहिरू मदुशंका, अकिला धनंजया, लक्षण संदाकन, इसुरु उडाना, कसुन रजिथा आणि लाहिरु कुमारा.