लंडन - आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेमध्ये उद्या रविवारी भारत विरुध्द पाकिस्तान यांच्यात 'हायहोल्टेज' सामना होणार आहे. याच सामन्याच्या पार्श्वभूमीवर भारताचा दिग्गज फलंदाज मास्टर-ब्लाटर सचिन तेंडूलकर याने आपल्या जीवनातील आठवणीतले किस्से सांगितले. यामध्ये प्रामुख्यानं सचिन यानं २००३ च्या विश्वकरंडक स्पर्धेत पाक विरुध्द झालेल्या सामना 'यादगार' असल्याचे सांगितले. या सामन्यानंतर संपूर्ण देश आनंदोत्सव साजरा करत होता. माझ्या अनेक मित्रांनी तर मला फोन करुन फटाक्याचा आवाज ऐकवत होते, असं सचिननं सांगितलं.
भारताने २०११ च्या आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेत जेतेपद पटकावले. हा सामना आनंददायी होता. मात्र, यापेक्षा २००३ साली झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेत पाकिस्तान विरुध्द झालेला सामना अविस्मरणीय असल्याचं सचिन यानं सांगितलं. २००३ विश्वकरंडक स्पर्धेमध्ये पाकिस्तान विरुध्द भारताचा सामना सेंचुरियन या मैदानावर झाला. या सामन्यात आम्ही चांगला खेळ करत पाकवर विजय मिळवला. हा विजय आमच्यासाठी 'खास' होता असंही सचिन म्हणाला.
२००३ च्या विश्वकरंडकात पाकिस्तान विरुध्द झालेल्या सामन्यात सचिनने ७५ चेंडूत ९८ धावांची खेळी केली. या खेळीत त्यानं पाकचे दिग्गज गोलंदाज वसीम अक्रम, वकार युनूस, शोएब अख्तर यांना चांगलेच झोडपलं होतं. सचिनच्या या खेळीमुळं त्याला सामनावीरचा पुरस्कार देण्यात आला होता. सचिन तेंडूलकरने १९९२, १९९६, १९९९, २००३, आणि २०११ साली विश्वकरंडक स्पर्धेत पाकिस्तान विरुध्द सामने खेळले आहेत.