लंडन - सध्या इंग्लंड आणि वेल्समध्ये आयसीसी वनडे विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धा मोठ्या दिमाखात चालू आहे. या स्पर्धेत सर्वच संघ २ गोष्टींपासून हैराण आहेत, त्या म्हणजे खेळाडूंना होणारी दुखापत आणि सामन्यादरम्यान येणारा पावसाचा व्यत्यय. पावसाच्या व्यत्ययामुळे आतापर्यंत ४ सामने रदद् करण्यात आले आहेत. तर आतापर्यंत वेगवेगळ्या देशांचे ३ खेळाडू दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. तर जाणून घेऊयात या विश्वकरंडक स्पर्धेतून दुखापतीमुळे बाहेर गेलेल खेळाडू...
![शिखर धवन](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/d8pa3wfvuaezqr__2006newsroom_1561006205_427.jpg)
शिखर धवन (भारत) - भारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवन दुखापतीमुळे विश्वकरंडक स्पर्धेतून बाहेर पडला आहे. धवन विश्वकरंडक स्पर्धेसाठी फिट नसून त्याला पूर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी दोन आठवड्यांपेक्षा जास्त वेळ लागणार आहे. त्यामुळे तो स्पर्धेतून माघार घेत असल्याची माहिती बीसीसीआयकडून देण्यात आली आहे. विश्वकरंडकात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात शिखरच्या डाव्या आंगठ्याला दुखापत झाली होती. धवनच्या जागेवर भारतीय संघात युवा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतची वर्णी लागली आहे.
![डेल स्टेन](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/3474894_dale-steyn.jpg)
डेल स्टेन (दक्षिण आफ्रिका) - दिग्गज वेगवान गोलंदाज डेल स्टेन विश्वकरंडक स्पर्धेच्या सुरुवातीलाच जखमी झाल्याने तो पूर्ण विश्वकरंडक स्पर्धेतून बाहेर पडला आहे. आजवर एकदाही विश्वकरंडक स्पर्धा न जिंकलेल्या दक्षिण आफ्रिकेला ही स्पर्धा त्यांचा प्रमुख गोलंदाज डेल स्टेनविनाच खेळावी लागत आहे. स्टेनच्या जागी डावखुरा वेगवान गोलंदाज ब्युरोन हॅन्ड्रिक्सला दक्षिण आफ्रिकेच्या संघात स्थान देण्यात आले आहे.
![मोहम्मद शहजाद](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/shahzad_1006newsroom_1560183227_446.jpg)
मोहम्मद शहजाद (अफगाणिस्तान) - अफगाणिस्ताचा स्फोटक आणि सलामीचा फलंदाज मोहम्मद शहजाद विश्वकरंडक स्पर्धेतून बाहेर फेकला गेला आहे. गुडघ्याला झालेल्या दुखापतीमुळे तो ही स्पर्धा खेळू शकणार नाहीय. यष्टीरक्षक फलंदाज असलेल्या शहजादच्याजागी अफगाणिस्तानच्या संघात इकराम अली खिलचा समावेश करण्यात आलाय.