लाहोर - पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) सरकारला नवीन कायदा करण्याची विनंती केली आहे. या नवीन कायद्यानुसार, क्रिकेटमधील मॅच फिक्सिंग आणि स्पॉट फिक्सिंगला गुन्हेगारीच्या श्रेणीत आणता येईल. पीसीबीचे अध्यक्ष एहसान मणी म्हणाले, की ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि श्रीलंका सारख्या देशांनी यापूर्वीच मॅच फिक्सिंगला गुन्हेगारीच्या प्रकारात आणले आहे. त्यानंतर ही गोष्ट आम्ही सरकारला कळवली आहे.
मणी म्हणाले, “हा कायदा बनवताना श्रीलंका क्रिकेट बोर्डाने स्वीकारलेल्या प्रक्रियेचे पीसीबी बारकाईने पालन करत आहे. आम्ही त्यांच्या प्रक्रियेचा बारकाईने अभ्यास करत आहोत आणि क्रिकेटमधील भ्रष्टाचार हा गुन्हेगारीचा विषय मानला जावा असे आम्हाला वाटते आहे. या प्रकरणात कायदा होईपर्यंत पीसीबी आयसीसीच्या सध्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याचे पालन करत राहील, ज्यामुळे बंदी आणि पुनर्वसन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर खेळाडूला क्रिकेटमध्ये परतण्याची परवानगी मिळते.”
पीसीबी अध्यक्ष पुढे म्हणाले, “मी कोणत्याही व्यक्तीबद्दल बोलणार नाही, परंतु या क्षणी ज्या खेळाडूंनी बंदीची शिक्षा पूर्ण केली आहे आणि पुनर्वसन प्रक्रिया पूर्ण केली आहे त्यांना पुन्हा खेळण्याचा हक्क आहे आणि ते सर्वांना लागू होते.”