हॅम्पशायर - इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये खेळण्यात येत असलेल्या विश्वकरंडक स्पर्धेच्या सराव सामन्यात आश्चर्यकारक चित्र पाहायला मिळाले. या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघ प्रथम फलंदाजी करत असताना इंग्लंडचा खेळाडू मार्क वूड जखमी झाला, त्यामुळे त्याला मैदान सोडावे लागले. त्याच्या जागी बदली खेळाडू म्हणून चक्क इंग्लंडकडून पॉल कॉलिंगवूड क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरला. पॉलला मैदानात पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता.
पॉल कॉलिंगवूड हा सध्या इंग्लंड क्रिकेट संघाचा सहायक प्रशिक्षक म्हणून काम पाहत आहे. कॉलिंगवूडने २०११ मध्ये शेवटचा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना खेळला आहे. इंग्लंड संघाने कॉलिंगवूडच्या नेतृत्वात टी-२० विश्वचषक आपल्या नावावर केला होता.
या सराव सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून इंग्लंडला १२ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. स्मिथच्या १०२ चेंडूत ११६ धावांच्या शतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियन संघाने इंग्लंडसमोर ९ गड्यांच्या मोबदल्यात २९८ धावांचे आव्हान ठेवले. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ २८५ धावांवर गारद झाला.