नवी दिल्ली - बीसीसीआयने यंदाच्या आयपीएलसाठी मुख्य प्रायोजक म्हणून चीनी कंपनी विवोशी फारकत घेतली. या वृत्तानंतर, आयपीएलचा नवा मुख्य प्रायोजक कोण असेल यावर चर्चा रंगल्या आहेत. अमेझॉन, जिओ या कंपन्यांची नावे समोर येत असून या शर्यतीत योगगुरू बाबा रामदेव यांची कंपनी पतंजलीचेही नाव जोडले गेले आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, पतंजली आयपीएल २०२० च्या प्रायोजकतेसाठी बोली लावण्यावर विचार करत आहे. पतंजलीचे प्रवक्ते एस.के तिजारावाला म्हणाले, "आम्ही यावर्षी आयपीएलच्या शीर्षक प्रायोजकत्वाबद्दल विचार करत आहोत. कारण पतंजली ब्रँडला जागतिक व्यासपीठावर नेण्याची आमची इच्छा आहे."
जूनमध्ये भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीनंतर देशात चीनच्या वस्तूंवर बहिष्कार टाकण्याविषयी मत झाले होते. त्यानंतर, प्रायोजक म्हणून आयपीएलने विवोला कायम ठेवल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने निषेध नोंदवला. या निषेधानंतर, विवोने प्रायोजकत्वातून माघार घेतल्याची बातमी समोर आली.
बीसीसीआयने चीनी कंपनीबरोबर प्रायोजकत्व राखून ठेवत देशाचा अपमान केला आहे. लोकांनी या टी-२० लीगवर बहिष्कार टाकला पाहिजे, असे आरएसएसशी संबंधित स्वदेशी जागरण मंचने म्हटले. विवो कंपनी बीसीसीआयला मुख्य प्रायोजकत्वासाठी दरवर्षी ४४० कोटी रुपये देते. विवोने २०१८ मध्ये २१९९ कोटींसह पाच वर्षांसाठी करार केला होता. हा करार २०२२ मध्ये संपुष्टात येणार होता.