नवी दिल्ली - पाकिस्तान क्रिकेट मंडळाला भारताने मोठा धक्का दिला आहे. भारतीय संघाने पाकिस्तानमध्ये क्रिकेट खेळण्यास नकार दिल्यामुळे पाकिस्तानकडून आशियाई स्पर्धेचे यजमानपद काढून घेण्यात आल्याचे वृत्त आहे.
पाकिस्तानमध्ये सप्टेंबर २०२० महिन्यात आशिया चषक स्पर्धा होणार होती. पण भारतीय संघाने सुरक्षेच्या कारणामुळे पाकिस्तानमध्ये क्रिकेट खेळण्यास नकार दिला. यामुळे आता ही स्पर्धा बांगलादेश, श्रीलंका किंवा दुबईमध्ये आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, यंदा आशिया चषक ही स्पर्धा टी-२० फॉरमॅटमध्ये खेळवण्यात येणार आहे. टी-२० विश्व करंडक स्पर्धेच्या एक महिना आधी ही स्पर्धा होणार आहे. त्यामुळे या स्पर्धेकडे टी-२० विश्व करंडक स्पर्धेची रंगीत तालीम म्हणून पाहिले जात आहे.
पाकिस्तानात २००९ मध्ये श्रीलंकेच्या संघाच्या बसवर दहशतवादी हल्ला झाला होता. यात ८ जण ठार तर अनेक जण जखमी झाले होते. या घटनेनंतर तब्बल दहा वर्षांनी श्रीलंका संघाने २०१९ मध्ये पाकिस्तानचा दौरा केला होता. यानंतर पाकिस्तान क्रिकेटसाठी सुरक्षित असल्याचे पाकचे म्हणणे होते. पण, भारतीय संघाने पाकिस्तानमध्ये खेळण्यास नकार दिला. यामुळे आशिया चषक दुसरीकडे आयोजित करण्यात येणार असल्याचे समजते.