मुंबई - आयपीएलच्या १३ व्या हंगामाला सुरुवात होण्यास काही दिवसांचा अवधी राहिला आहे. सर्व संघ स्पर्धेसाठी युएईमध्ये दाखल झाले आहेत. अशात काही महत्वाच्या खेळाडूंनी स्पर्धेतून अचानक माघार घेतली आहे. यामुळे फ्रेंचायझी त्या माघार घेतलेल्या खेळाडूच्या जागेवर चांगला पर्याय निवडण्याचा प्रयत्न करत आहेत.
बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रेहमानला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी दोन संघ इच्छुक आहेत. पण बांगलादेश क्रिकेट बोर्डाने रेहमानला आयपीएलमध्ये खेळण्यासाठी ना-हरकत प्रमाणपत्र देण्यास नकार दिला आहे. बांगलादेशचा संघ ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात बांगलादेशचा संघ श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. यामुळे बांगलादेश बोर्डाने त्याला प्रमाणपत्र देण्यास नकार दिला आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स हे दोन संघ मुस्तफिजूरला संघात स्थान देण्यासाठी उत्सुक आहेत. मुंबई इंडियन्स संघाचा अनुभवी गोलंदाज लसिथ मलिंगाने स्पर्धेतून माघार घेतली आहे. मुंबईने मलिंगाच्या जागेवर ऑस्ट्रेलियाच्या जेम्स पॅटिन्सनला संघात घेतले आहे. पण मुस्तफिजूरही आपल्या संघात हवा, यासाठी मुंबई इंडियन्स इच्छुक आहे. मुंबईशिवाय कोलकाता नाईट रायडर्सही मुस्तफिजूरसाठी आग्रही आहे. केकेआर हॅरी गुर्नेच्या जागेवर नवीन खेळाडूच्या शोधात आहे.
याबाबत बांगलादेश क्रिकेट बोर्डाने सांगितले की, मुस्तफिजूरला आयपीएलमध्ये खेळण्याबाबत विचारणा करण्यात आली. पण आमचा संघ श्रीलंका दौऱ्यावर जाणार असल्यामुळे त्याला ना-हरकत प्रमाणपत्र देण्यात आलेले नाही. दरम्यान, मुस्तफिजूरने याआधीही आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स, सनराईजर्स हैदराबाद या संघांचं प्रतिनिधीत्व केले आहे.