नवी दिल्ली - भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्माने माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला आतापर्यंतचा देशाचा सर्वश्रेष्ठ कर्णधार म्हटले आहे. भारताच्या टी-२० संघाचा उपकर्णधार रोहितने नुकत्याच एका कार्यक्रमात हजेरी लावली. या कार्यक्रमात त्याने धोनीबद्दल प्रतिक्रिया दिली.
हेही वाचा - भारताविरुद्धच्या पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांसाठी विल्यमसन संघाबाहेर
'धोनी शांत क्रिकेटपटू आहे. या स्वभावामुळे त्याला मैदानावर चांगले निर्णय घेण्यात मदत झाली. आयसीसीच्या तिन्ही स्पर्धांचा तो विजेता आहे. तसेच त्याने आयपीएलमध्येही अनेकवेळा विजेतेपदे जिंकली आहेत. तो भारताचा सर्वोत्कृष्ट कर्णधार आहे. तणाव आणि दबावाच्यावेळी तो त्याचा शांत स्वभाव जपतो', असे रोहित म्हणाला.
'मी अनेक युवा गोलंदाजांना धोनी दबावाच्या वेळी सांभाळून घेताना पाहिले आहे. या गोष्टीमुळे जेव्हा अनुभवी खेळाडू अशी वागणूक देतात तेव्हा युवा खेळाडूंचा विश्वास वाढतो', असेही रोहित म्हणाला.
न्यूझीलंडला टी-२० मालिकेत गारद केल्यानंतर, टीम इंडिया आता एकदिवसीय आणि कसोटी मालिकेसाठी सज्ज झाला आहे. आगामी दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली. तत्पूर्वी, भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा दुखापतीमुळे एकदिवसीय आणि कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे.