मुंबई - भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या ५ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील शेवटच्या २ सामन्यांसाठी महेंद्रसिंह धोनीला विश्रांती देण्यात आला आहे. तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून भारताचा ३२ धावांनी पराभव झाला. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत संजय बांगर यांनी संघात करण्यात येणाऱ्या बदलांबद्दल माहिती दिली.
संजय बांगर म्हणाले, शेवटच्या २ सामन्यांसाठी संघात काही बदल होतील. धोनी शेवटच्या २ सामन्यात खेळणार नाही. त्याला विश्रांती देण्यात आली आहे. त्याच्याऐवजी ऋषभ पंत संघात यष्टीरक्षणाची जबाबदारी सांभाळणार आहे. धोनीने पहिल्या ३ सामन्यात एकूण ८५ धावा केल्या आहेत. पहिल्या सामन्यात नाबाद ५९ धावांची खेळी केल्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यात धोनी अनुक्रम शून्य आणि २६ धावांवर बाद झाला आहे.
भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेतील चौथा सामना १० मार्चला मोहाली येथे होणार आहे. तर, दिल्ली येथील फिरोजशाह कोटला मैदानावर मालिकेतील शेवटचा पाचवा सामना होणार आहे. मालिकेत भारतीय संघ २-१ अशा आघाडीवर आहे.