वायनाड - खराब फॉर्ममुळे भारतीय कसोटी संघातून बाहेर बसविलेल्या लोकेश राहुलची अखेर बॅट तळपली. लोकेश राहुल (नाबाद ८८) आणि प्रियांक पांचाल (८९) यांच्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर भारत 'अ' संघाने इंग्लंड लॉयन्स संघाविरुद्ध खेळताना पहिल्या डावात दुसऱ्या दिवसअखेर १ बाद २१९ धावा केल्या. कृष्णागिरी स्टेडियम येथे सुरू असलेल्या अनौपचारिक सामन्याचा कालचा दुसरा दिवस होता.
भारत 'अ' संघ अजून १२१ धावांनी पिछाडीवर आहे. इंग्लंड लॉयन्सने पहिल्या डावात ३४० धावा केल्या आहेत. राहुल आणि पांचाल यांनी दुसऱ्या गड्यासाठी १७१ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. दोघांनी लॉयन्स संघाच्या गोलंदाजांना चांगलाच घाम फोडला. राहुलने १८२ चेंडूचा सामाना करत ११ शानदार चौकार मारत ८८ धावांची नाबाद खेळी केली. पांचालने १४१ चेंडूत १६ चौकारंची आतषबाजी करत ८९ धावा केल्या. आज सामन्याचा तिसरा दिवस असून दोघेही शतकाच्या जवळ आहेत.
अभिमन्यू ईश्वरण ७९ चेंडूत ५ चौकारांच्या मदतीने ३१ धावा केल्या. इंग्लंडच्या संघातील जॅक चॅपेल याला एकमेव गडी बाद करता आला. इंग्लंड लॉयन्स संघाने ५ बाद ३०३ धावांवरुन दुसऱ्या दिवशी खेळ सुरू केला. इंग्लंड लॉयन्सच्या संघाला ४० धावा अतिरिक्त मिळाल्या. पाहुण्या संघातील बेन डकेट ८०, विल जॅक्स ६३ आणि सॅम हेन ६१, स्टीवन मुलाने ने ४२ तर मॅक्स हेडन याने २६ धावांचे योगदान दिले. भारत 'अ' संघाकडून नवदीप सैनीने पाच फलंदाजांना माघारी धाडले. तर शार्दुल ठाकूर आणि आवेश खानला प्रत्येकी २ गडी बाद केले. जलज सक्सेना आणि शहबाज नदीम यांना प्रत्येकी एक गडी बाद करण्यात यश आले.