नवी दिल्ली - न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सनने विंडीजविरुद्धच्या कसोटीत द्विशतक ठोकले. त्याच्या या आनंदात अजून भर पडली आहे. केन विल्यम्सन आता पालकत्व रजेवर जाणार आहे. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने याबाबत त्याला मंजूरी दिली.
हेही वाचा - स्टार क्रिकेटपटूने निवृत्ती घेतली मागे, 'या' संघाकडून खेळणार क्रिकेट
काही दिवसांपूर्वी, बीसीसीआयने टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला पालकत्व रजा मंजूर केली. भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यात १७ डिसेंबरपासून चार कसोटी सामन्याची बॉर्डर-गावसकर कसोटी मालिका खेळणार आहे. यातील पहिल्या सामन्यानंतर विराट कोहली मायदेशी परतणार आहे. आता विराटनंतर विल्यम्सनही पालकत्व रजेसाठी त्याच्या घरी जाईल. केन विल्यम्सन प्रथमच 'बाबा' होणार आहे. त्यामुळे त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून ब्रेक घेत पत्नीसोबत वेळ घालवण्याचा निर्णय घेतला आहे.
'सामनावीर' विल्यम्सन -
वेस्ट इंडिजविरुद्ध हॅमिल्टन येथे झालेल्या पहिल्या कसोटीत न्यूझीलंड संघाने एक डाव आणि १३४ धांवानी विजय मिळवत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. विंडीजच्या जेरमाईन ब्लॅकवुडच्या १०४ धावांच्या खेळीनंतरही वेस्ट इंडिजला पराभवापासून दूर जाता आले नाही. कर्णधार केन विल्यम्सनने ठोकलेल्या दुहेरी शतकामुळे त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.