बंगळुरु - राजस्थान रॉयल्सचा अष्टपैलू खेळाडू कृष्णप्पा गौतमने कर्नाटक प्रीमियर लीगमध्ये ५६ चेंडूत १३४ धावांची खेळी केली. या खेळीसाबत त्याने गोलंदाजी करताना प्रतिस्पर्धी संघातील ८ गडी बाद केले. मात्र, या कामगिरीपेक्षा गौतमला एक गोष्ट जास्त आवडली आहे.
'मी केलेल्या या कामगिरीपेक्षा मला माझ्या गर्लफ्रेंडच्या चेहऱ्यावरची स्माईल आवडली', असे गौतमने म्हटले आहे. या सामन्यानंतर, गौतमला फलंदाजी आणि गोलंदाजी यापैकी जास्त काय आवडले? असे विचारण्यात आले होते. त्यावर गौतमने मिश्किलपणे उत्तर दिले आहे.
कर्नाटक प्रीमियर लीगमध्ये शुक्रवारी झालेल्या बेल्लारी टस्कर्स विरुद्ध शिवमोग्गा लायन्स हा सामन्यात सामना लक्षणीय ठरला होता. या सामन्यात कर्नाटकचा अष्टपैलू खेळाडू कृष्णप्पा गौतम याने फलंदाजी करताना तुफान फटकेबाजी तर केलीच पण त्यासोबत त्याने गोलंदाजीतही कमाल केली. या सामन्यात त्याने गोलंदाजी करताना प्रतिस्पर्धी संघातील ८ गडी बाद केले.
कृष्णप्पा गौतमने बेल्लारी टस्कर्सकडून खेळताना ५६ चेंडूत तडाकेबाज १३४ धावांची खेळी केली. यात त्याने ७ चौकार आणि १३ षटकार लगावले. त्यानंतर त्याने गोलंदाजीतही आपली कमाल दाखवत शिवमोग्गा लायन्सचे अवघ्या १४ धावांमध्ये ८ गडी बाद केले.
गौतमने केलेल्या या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर बेल्लारीने हा सामना ७० धावांनी जिंकला. सुरुवातीला बेल्लाने १७ षटकांत ३ बाद २०३ धावा केल्या होत्या. त्याला प्रत्युत्तरादाखल खेळणाऱ्या शिवमोग्गाला १३३ धावांपर्यंत मजल मारता आली. दरम्यान, कृष्णप्पाने गौतमने कर्नाटक प्रीमियर लीगच्या इतिहासात सर्वोच्च धावसंख्येसह गोलंदाजीतही सर्वोत्तम कामगिरी केली.