मुंबई - जसप्रीत बुमराह सद्यघडीला जगातील सर्वोत्कृष्ट गोलंदाज आहे. तो वेगाने गोलंदाजी करतो. त्यामुळे फलंदाजाकडे चेंडू खेळण्यासाठी फार वेळ नसतो. तसेच तो सतत योग्य टप्प्यावर गोलंदाजी करत राहतो. त्यामुळे फलंदाजांच्या अडचणी, अधिकच वाढतात. अखेरच्या षटकांमध्ये तो यॉर्करचा मारा करण्यात पटाईत आहे. याच गुणांच्या जोरावर त्याने जगभरातील फलंदाजांच्या मनात दहशत निर्माण केली आहे. आता तर एक माजी दिग्गज खेळाडूनेही बुमराहच्या गोलंदाजीची भिती मनात निर्माण झाल्याची प्राजंळ कबुली दिली आहे. वेस्ट इंडीजचा माजी दिग्गज खेळाडू ब्रायन लाराने आपल्याला बुमराहचा सामना करणे जमले नसते, असे म्हटले आहे.
एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीमध्ये लाराने बुमराहचे कौतुक केले. तो म्हणाला की, 'मी एकवेळ कपिल देव, जवागल श्रीनाथ आणि मनोश प्रभाकर यांच्या गोलंदाजीचा सामना करेन. पण बुमराहचा सामना करणे मी मूळीच पसंत करणार नाही. लाराच्या या वक्तव्यावरूनच बुमराहने त्याला किती प्रभावित केले आहे, याचा प्रत्यय येतो.
बुमराह-ऑर्चर ऑलटाइम सर्वोत्कृष्ट गोलंदाज
जसप्रीत बुमराह आणि इंग्लडचा जोफ्रा ऑर्चर या दोन गोलंदाजांचा सामना करणे, आव्हानात्मक आहे. हे दोघे कोणत्याही दशकात खेळले असते तर त्याचे नाव घेण्यात आलेच असते. ७० ते ९० किंवा अगदी २००० सालात ते क्रिकेट खेळत असते तर त्यांचे नाव असतचं. जिथे पर्यत मी पाहिले आहे आणि आताही पाहात आहे, हे दोन गोलंदाज कोणत्याही युगात सर्वश्रेष्ठ ठरतील.
बुमराह-शमी जोडीचे कौतूक
लाराने बुमराहसोबत मोहम्मद शमीचे देखील कौतूक केले. तो म्हणाला की, बुमराह-शमी जोडी टी-२० क्रिकेट जरी खेळत असली तरी ते कसोटीच्या लेंथने गोलंदाजी करतात. यामुळे आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्यांच्यासाठी कोणतीही अडचण निर्माण होणार नाही.
अशी आहे बुमराहची आयपीएल २०२० मधील कामगिरी -
बुमराहने आयपीएलच्या तेराव्या हंगामात १४ सामने खेळली आहेत. यात त्याने ६.७१ च्या इकोनॉमीने २७ गडी बाद केले आहेत. १४ धावात ४ अशी बुमराहची सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे.