मँचेस्टर - इंग्लंड विरुद्ध खेळल्या जाणार्या तिसर्या आणि अंतिम कसोटी सामन्यात वेस्ट इंडीजचा कर्णधार जेसन होल्डरने विशेष कामगिरी केली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये 2000 पेक्षा जास्त धावा आणि 100 हून अधिक बळी घेतलेला कॅरेबियन क्रिकेट इतिहासातील सर्वात वेगवान खेळाडू म्हणून होल्डरच्या नावाची नोंद झाली आहे.
होल्डरने आपल्या कारकिर्दीतील 43 व्या कसोटी सामन्यात ही कामगिरी केली. पहिल्या डावात 46 धावा करताच 2000 कसोटी धावा पूर्ण करणारा तो इंडिजचा 38 वा फलंदाज ठरला.
तसेच 2000 पेक्षा जास्त धावा आणि 100 बळी घेतलेल्या खेळाडूंच्या यादीतही तो सामील झाला आहे. सर गॅरी सोबर्स आणि कार्ल हूपर यांच्यानंतर होल्डर हे स्थान गाठणारा विंडीजचा तिसरा खेळाडू ठरला आहे.
सोबर्स यांनी यापूर्वी, 1965 मध्ये हा पराक्रम केला होता. कारकिर्दीतील 48 वा कसोटी सामना खेळताना 2000 धावा आणि 100 हून अधिक बळी अशी दुहेरी कामगिरी करणारे वेस्ट इंडीजचे पहिले खेळाडू ठरले होते. यानंतर, माजी कर्णधार कार्ल हूपरने 2001 मध्ये कारकिर्दीतील 90 वा कसोटी सामना खेळताना हा पराक्रम रचला होता.
अशी कामगिरी करणारा होल्डर हा जगातील 31 वा क्रिकेटपटू आहे. त्याच्याआधी इंग्लंडच्या आठ, भारताचे सहा, ऑस्ट्रेलियाचे चार, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडीज आणि न्यूझीलंडचे प्रत्येकी तीन, पाकिस्तानचे दोन, श्रीलंका आणि बांगलादेशच्या एका खेळाडूने हा विक्रम केला आहे.