साऊथम्प्टन - इंग्लंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने निवृत्तीच्या बातम्यांना फेटाळून लावले आहे. अजूनही आपल्याला क्रिकेटची भूक असल्याचे अँडरसनने सांगितले. अलीकडच्या काळात ३८ वर्षीय अँडरसन त्याच्या सर्वोत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसत नाही. पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात त्याने एक बळी घेतला. तर, दुसर्या डावात त्याला यश मिळाले नाही.
एका वृत्तानुसार अँडरसन म्हणाला, "हा आठवडा वैयक्तिकरित्या मला निराश करणारा ठरला आहे. मी फारशी चांगली गोलंदाजी केली नाही आणि मला वाटते की मी लयमध्ये नाही. बहुधा दहा वर्षांत प्रथमच मी मैदानावर थोडा भावूक झालो.''
तो पुढे म्हणाला, "मी जरा निराश झालो. मला आठवतंय की मी कधी खेळायला सुरुवात केली. जेव्हा आपण निराश होतो आणि रागावतो, तेव्हा आपण आणखी वेगवान गोलंदाजीचा प्रयत्न करतो. पण ही गोष्ट आपल्याला मदत करत नाही. मला अॅशेसमध्ये खेळायचे आहे. मला शक्य तितक्या वेळ खेळायचे आहे. मला अजून खेळण्याची भूक आहे."
तो म्हणाला, "मी या आठवड्याप्रमाणे गोलंदाजी केली आणि मी जर अशीच गोलंदाजी करत राहिलो तर निवृत्ती घेण्याची संधी माझ्या हातातून जाईल. ही निवडीची बाब असेल. मला वाटते की हा आठवडा माझ्यासाठी निराशेचा होता."