अबुधाबी - आयपीएलच्या तेराव्या हंगामाला आजपासून सुरूवात होणार आहे. स्पर्धेतील पहिला सामना गतविजेत्या मुंबई इंडियन्स आणि उपविजेत्या चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळला जाईल. सलामीचा सामना पाहण्यासाठी क्रिकेट चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. कारण, १५ ऑगस्टला अचानकपणे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या महेंद्रसिंह धोनी पुन्हा मैदानात पाहायला मिळेल. दुसरीकडे रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सचा संघ विजयी सुरूवात करण्यासाठी उत्सुक आहे.
उभय संघातील आकडेवारी पहिल्यास मुंबई इंडियन्सचा संघ चेन्नईवर वरचढ ठरलेला आहे. मुंबई आणि चेन्नई यांच्यात आतापर्यंत २८ सामने झाले आहे. यात चार वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबईने चेन्नईला १७ वेळा पराभूत केले आहे. तर चेन्नईने ११ विजय मिळविले आहेत. असे असले तरी, रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्स संघाने सलामीचा सामना अद्याप जिंकलेला नाही.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यंदाची स्पर्धा यूएईमध्ये आयोजित करण्यात येणार असून, पहिल्यांदाच या अत्यंत लोकप्रिय क्रिकेट स्पर्धेत प्रेक्षकांची उपस्थिती नसणार आहे. सलामीचा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजून ३० मिनिटानी सुरू होईल. हा सामना अबुधाबीच्या शेख झायेद स्टेडियमध्ये खेळला जाणार आहे.
मुंबई इंडियन्सचा संघ -
रोहित शर्मा (कर्णधार), क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, इशान किशन, केरॉन पोलार्ड, कृणाल पांड्या, हार्दिक पांड्या, नॅथन कुल्टर-नाइल, राहुल चाहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह, धवल कुलकर्णी, सौरभ तिवारी, जेम्स पॅटिंसन, आदित्य तारे, मिशेल मॅकक्लेनाघन, क्रिस लीन, जयंत यादव, अनमोलप्रीत सिंह, अनुकुल रॉय, मोहसिन खान, शेरफेन रदरफोर्ड, दिग्विजय देशमुख आणि प्रिंस बलवंत राय.
चेन्नई सुपर किंग्सचा संघ -
एमएस धोनी (यष्टीरक्षक/कर्णधार), शेन वॉटसन, अंबाती रायुडू, फाफ डु प्लेसिस, केदार जाधव, ड्वेन ब्रावो, रवींद्र जडेजा, पीयूष चावला, दीपक चाहर, शार्दुल ठाकुर, इमरान ताहिर, मुरली विजय, कर्ण शर्मा, जोश हेजलवुड, लुंगी एनगिदी, मोनू कुमार, मिशेल सेंटनर, सॅम क्यूरन, रवि श्रीनिवासन साई किशोर, एन जगदीसन, रुतुराज गायकवाड आणि केएम आसिफ.