नवी दिल्ली - आयसीसी १९ वर्षांखालील विश्वकरंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर झालेल्या भारत-बांगलादेश विवादावर माजी क्रिकेटपटू बिशनसिंग बेदींनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. भारतीय संघाच्या वर्तणुकीवर बेदी यांनी टीका केली आहे. सामन्यानंतर दोन्ही संघांचे खेळाडू एकमेकांना धक्का देताना दिसले होते.
हेही वाचा - १८ वर्षीय क्रिकेटपटूचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!
बेदी यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले, 'तुम्ही खराब फलंदाजी करता, तुम्ही खराब गोलंदाजी करता, खराब क्षेत्ररक्षण करता. खेळामध्ये हे होतच असते. परंतू, विरूद्ध खेळाडूंना धक्का देणे अशोभनीय आहे. त्यांच्यामधील या वयातील निरागसपणा अजिबात दिसला नाही. बांगलादेशी खेळाडूंचे वर्तन कसे होते ही आपली समस्या नाही. मात्र, आपण जे त्यांच्याशी केले ते योग्य नव्हते.'
बांगलादेशने रविवारी भारताला तीन विकेट्सनी पराभूत करून प्रथमच विश्वकरंडक स्पर्धेचे जेतेपद पटकावले. तर, भारतीय संघाचे पाचव्यांदा विजेतेपद जिंकण्याचे स्वप्न धूळीस मिळाले.
काय आहे प्रकरण -
विश्व करंडक स्पर्धेचा अंतिम सामना जिंकल्यानंतर बांगलादेशचे खेळाडू जल्लोष करण्यासाठी मैदानावर धावून आले. यातील काही खेळाडूंनी भारतीय खेळाडूंना पाहून आक्षेपार्ह इशारे केले. यादरम्यान, दोन्ही संघाच्या खेळाडूंमध्ये बाचाबाची झाली. यात बांगलादेशच्या झेंड्याचेही नुकसान झाले. वेळीच पंचांच्या मध्यस्थी करत वाद सोडवला.