नवी दिल्ली - इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) संपल्यानंतर भारतीय संघाला ऑस्ट्रेलिया दौर्यावर जावे लागणार आहे. मात्र, या दौऱ्यापूर्वी, एक वाईट बातमी समोर आली आहे. भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा या दौऱ्याला मुकण्याची शक्यता आहे.
आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणारा अनुभवी वेगवान गोलंदाज इशांत शर्मा दुखापतीमुळे आयपीएलच्या सध्याच्या सत्रातून बाहेर पडला. ७ ऑक्टोबरला प्रशिक्षण सत्रात इशांतचे स्नायू ताणले गेले होते. एका संकेत स्थळावर प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, इशांत तीन आठवड्यांसाठी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये रिहॅबिलिटेशनसाठी असणार आहे. सहसा कोणत्याही खेळाडूला अशा दुखापतीमुळे सुमारे दोन महिने मैदानापासून दूर रहावे लागते.
याचा अर्थ इशांतला ऑस्ट्रेलिया दौरा करणे शक्य होणार नाही. या महिन्याच्या शेवटी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची निवड होऊ शकते. २०१८-१९मध्ये भारताने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरी पराभूत केले होते. ही मालिका भारताने २-१ अशी जिंकली होती. संघाच्या विजयात इशांतने महत्त्वाची भूमिका बजावली होती. इंशाटने तीन सामन्यांत ११ बळी मिळवले होते. इशांतने भारताकडून ९७ कसोटी, ८० एकदिवसीय आणि १४ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.