नवी दिल्ली - भारत विरुध्द दक्षिण आफ्रिका संघामध्ये ३ सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात आली. भारताने या मालिकेत ३-० असे निर्भेळ यश संपादन केले. दरम्यान, या मालिकेत भारतीय संघाने फलंदाजीबरोबर गोलंदाजीतही सर्वश्रेष्ठ कामगिरी केली. महत्वाचे म्हणजे, आफ्रिकेला तब्बल दोन सामन्यात फॉलोऑन देत भारताने सामने डाव राखून जिंकले. दरम्यान, या मालिकेत १० विश्वविक्रमांची नोंदविण्यात आले आहेत.
- आफ्रिकेविरुध्दच्या मालिकेतील विश्वविक्रम -
- आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तीनही (कसोटी, एकदिवसीय आणि टी-२०) प्रकारात सलामीवीर म्हणून खेळताना रोहित शर्माने शतक झळकावलं आहे. पहिल्या कसोटीत शतकी खेळी केल्यानंतर रोहित अशा कारमाना करणारा जगातील पहिला खेळाडू आहे.
- विशाखापट्टणमच्या कसोटी सामन्यात रविंद्र जडेजाने आपल्या कारकिर्दीतील २०० विकेटचा टप्पा पार केला. महत्वाचे म्हणजे, जडेजाने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद २०० विकेट घेतल्या असून हा एक विश्वविक्रम आहे. दरम्यान, सर्वाधिक जलद २०० विकेट घेण्याचा विक्रम श्रीलंकेच्या रंगना हेरथच्या नावे होता.
- विशाखापट्टणम येथे खेळवण्यात आलेल्या कसोटी सामन्यात रोहित शर्माने १३ षटकार ठोकत, एका सामन्यात सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत अव्वल स्थान पटकावले. यापूर्वी हा विक्रम पाकिस्तानचा वसीम अक्रमच्या नावे होता. तो विक्रम रोहितने मोडित काढला.
- कसोटी क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून प्रथमच मैदानात उतरलेल्या रोहित शर्माने पहिल्याच सामन्याच्या दोनही डावात शतकी खेळी केली. असा कारमाना करणारा रोहित जगातील पहिला खेळाडू आहे. रोहितने सलामीवीराच्या पदार्पणाच्या सामन्यात पहिल्या डावात १७६ तर दुसऱ्या डावात १२७ धावांची खेळी केली होती.
- आफ्रिकेविरुध्दच्या मालिकेत फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने आपल्या कारकिर्दीत ३५० वा गडी बाद केला. महत्वाचे म्हणजे, अश्विनने सर्वधिक जलद ३५० विकेट घेण्याचा टप्पा पार करत श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरनच्या विक्रमाशी बरोबरी साधली आहे.
- टेस्ट क्रिकेटमध्ये खेळताना विराट कोहलीने कारकिर्दीतील १९ वे शतक झळकावले आणि ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगच्या विक्रमांशी बरोबरी साधली.
- आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराट कोहलीने कर्णधार या नात्याने तब्बल ९ वेळा १५०+ धावा करत सर डॉन ब्रँडमनला मागे टाकले.
- भारतीय संघाने आफ्रिकेविरुध्दची मालिका जिंकत मायदेशात सलग ११ मालिका जिंकण्याचा विश्वविक्रम केला. यापूर्वी हा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या नावे होता. त्यांनी मायदेशात १० मालिका जिंकल्या होत्या.
- रोहित शर्माने संपूर्ण मालिकेत १९* षटकार ठोकत वेस्ट इंडीजच्या शिमरोन हेटमेयरचा विक्रम मोडला. हेटमेयरने २०१८ मध्ये बांगलादेश विरुध्दच्या मालिकेत १५ षटकार ठोकले होते.