मोहाली - भारत आणि दक्षिण आफ्रिका संघातील दुसऱ्या टी-२० सामन्यामध्ये भारताने निर्विवाद वर्चस्व राखत आफ्रिकेवर ७ गडी राखून विजय मिळवला. यासह भारताने ३ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी मिळवली. आफ्रिकेविरुद्ध सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहलीने नाबाद ७२ धावांची खेळी करत इतिहास रचला. या खेळीमुळे विराट कोहलीला 'सामनावीर' पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या सामन्यात कोहलीने टी-२० आंतरराष्ट्रीय कारकीर्दीचे २२ वे अर्धशतक झळकावले. या अर्धशतकासह कोहलीने टी-२० प्रकारात २१ अर्धशतके झळकावण्याचा टीम इंडियाचा उपकर्णधार रोहित शर्माचा विश्वविक्रम मोडला.
हेही वाचा - IND VS SA : भारताचा आफ्रिकेवर ७ गडी राखून विजय
या शिवाय, कोहली टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. महत्त्वाचे म्हणजे, हाही रेकार्ड रोहित शर्माच्याच नावे होता. रोहितचा हा रेकार्डही विराटने मोडीत काढला आहे. विराटने आजवर टी-२० मध्ये २४४१, तर रोहितने २४३४ धावा केल्या आहेत. या रेकार्डमध्ये विराट अव्वल क्रमांकावर तर रोहित दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. तर, न्यूझीलंडचा मार्टिन गप्टिल तिसऱ्या क्रमांकावर आहे.
हेही वाचा - IND VS SA : हवेत सूर मारुन कर्णधार कोहलीने घेतला 'विराट' झेल, पाहा व्हिडिओ
विराट कोहलीने या दोन विश्वविक्रमासह आणखी एक विक्रम केला आहे. आफ्रिकेविरुध्द ७२ धावांच्या खेळीनंतर विराट कोहलीची टी-२० क्रिकेटमधील सरासरी ५० पार गेली आहे. तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये ५० पेक्षा जास्त सरासरी असणारा विराट कोहली एकमेव फलंदाज आहे.
अशी कामगिरी करणारा विराट जगातला एकमेव फलंदाज आहे. विराट कोहलीची टी-२० मधील सरासरी ५०.८५ झाली आहे. तर एकदिवसीयमध्ये ६०.३१ आणि कसोटीमध्ये ५३.१४ सरासरीने विराटने धावा केल्या आहेत.