नवी दिल्ली - भारत-बांगलादेश संघातील टी-२० मालिकेतील पहिला सामना दिल्लीच्या अरुण जेटली मैदानावरच खेळवण्यात येणार, हे आता फिक्स झाले आहे. दिल्लीतील प्रदूषणामुळे हा नियोजित सामना सूरतच्या मैदानावर स्थलांतरित करण्यात येणार असल्याची चर्चा होती. मात्र, बीसीसीआयने नियोजित वेळापत्रकानुसारच हा सामना दिल्लीत होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. याविषयी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी प्रदूषणाचा परिणाम सामन्यावर होणार नसल्याचे सांगितले आहे.
सूत्राच्या माहितीनुसार, बीसीसीआयने दिल्ली प्रदूषण नियंत्रण मंडळाशी चर्चा करुन या संदर्भातील परवानगी घेतली आहे. प्रदूषण मंडळाच्या म्हणण्यानुसार, ३ नोव्हेंबरला वातावरण स्वच्छ राहील. दरम्यान, याविषयी मुख्यमंत्री केजरीवाल यांनी प्रदूषणाचा परिणाम सामन्यावर होणार नाही. तसेच आम्ही हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करत असल्याचे सांगितले आहे.
भारत-बांगलादेश सामन्याच्या ऑनलाईन तिकिट विक्रीला सुरूवात करण्यात आली असून आतापर्यंत जवळपास ७५ लाख रुपयांची तिकीट विक्री झाली असल्याचे समजते. दरम्यान, दिल्लीत २०१७ मध्येही श्रीलंका क्रिकेट संघाच्या खेळाडूंनी प्रदूषणामुळे कसोटी सामन्यादरम्यान क्षेत्ररक्षण करण्यास नकार दिला होता. त्यावेळी देखील, दिल्लीत प्रदूषणाची पातळी खूपच जास्त खालावली होती आणि बरेच श्रीलंकन खेळाडू मास्क घालून मैदानावर उतरले होते. सामना संपल्यानंतर काही खेळाडू तर आजारीही पडले होते.
हेही वाचा - 'कॅप्टन' विराट कोहली दहशतवाद्यांच्या निशाण्यावर...
हेही वाचा - Ind vs Ban १st t२०: नियोजित वेळापत्रकानूसार होणार दिल्लीतील भारत-बांगलादेश सामना