सिडनी - ऋषभ पंत आणि चेतेश्वर पुजारा या दोघांनी चौथ्या गड्यासाठी नाबाद १०४ धावांची भागिदारी करत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात रंगत आणली आहे. पंतने झुंजार अर्धशतक झळकावले. ऑस्ट्रेलियाने भारतासमोर विजयासाठी ४०७ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. प्रत्युत्तरादाखल भारतीय संघाने उपहारापर्यंत ३ बाद २०६ धावा केल्या आहेत. पंत ७३ तर पुजारा ४१ धावांवर नाबाद खेळत आहे.
सिडनी कसोटीचा आज पाचवा आणि अखेरचा दिवस आहे. काल चौथ्या दिवसाअखेर भारतीय २ बाद ९८ धावा केल्या होत्या. आज पाचव्या दिवसाचा खेळ सुरू झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नॅथन लिओनने कर्णधार अजिंक्य रहाणेला बाद केले. रहाणेने ४ धावा केल्या. यानंतर भारतीय संघाच्या अडचणीत वाढ झाली. तेव्हा फलंदाजीत बढती मिळालेल्या ऋषभ पंतने पाचव्या स्थानावर येऊन झंझावती खेळी केली. त्याने, ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा खसपूस समाचार घेतला. तर दुसरी बाजू पुजाराने लावून धरली.
पंतने ९७ चेंडूत ८ चौकार आणि ३ षटकारांसह नाबाद ७३ धावा केल्या आहेत. तर चेतेश्वर पुजाराने १४७ चेंडूत ५ चौकारांच्य मदतीने ४१ धावा जमवल्या आहेत. भारतीय संघाने उपहारापर्यंत ३ बाद २०६ धावा केल्या आहेत. जिंकण्यासाठी भारतीय संघाला आणखी २०१ धावांची गरज आहे. तर ऑस्ट्रेलियाला हा सामना जिंकण्यासाठी ७ गडी बाद करावे लागणार आहेत.
दरम्यान, पंतला पहिल्या डावात फलंदाजीदरम्यान, दुखापत झाली होती. यामुळे तो दुसऱ्या डावात यष्टीरक्षणासाठी मैदानात आला नाही. त्याच्या जागेवर वृद्धीमान साहाने यष्टीरक्षण केले. संघाला गरज असताना, पंतने दुखापतग्रस्त असताना, फलंदाजीला उतरण्याचे धाडस केले आणि झंझावती खेळी केली. पंत आणि पुजारा यांच्या नाबाद शतकी भागिदारीमुळे हा सामना रंगतदार स्थितीत पोहोचला आहे.
गरज भासल्यास दुखापतग्रस्त जडेजाही फलंदाजीला उतरणार...
ऑस्ट्रेलियाने भारतासमोर विजयासाठी ४०७ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. रोहित-शुबमनच्या आश्वासक सलामीनंतर हा सामना रंगतदार होण्याची शक्यता आहे. अशात जर भारतीय संघाला गरज भासल्यास रविंद्र जडेजा, जो की दुखापतग्रस्त आहे, तो वेदना कमी करणारे इंजेक्शन घेऊन मैदानात फलंदाजीसाठी येऊ शकतो. बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले की, 'भारतीय संघाला कसोटी सामना वाचविण्याची गरज भासल्यास जडेजा इंजेक्शन घेऊन फलंदाजी करेल.'
हेही वाचा - गरज भासल्यास जडेजा इंजेक्शन घेऊन फलंदाजीला येणार
हेही वाचा - पंचांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करणे ऑस्ट्रेलियन कर्णधाराला भोवले