दुबई - भारतीय संघाने न्यूझीलंडला ५ सामन्याच्या टी-२० मालिकेत ५-० ने 'व्हाईट वॉश' दिला. भारतीय संघाने अखेरचा सामना फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तीनही आघाड्यावर शानदार कामगिरी करत ७ धावांनी जिंकला. दरम्यान, या विजयानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने भारतीय संघाला दंड ठोठावला आहे.
अखेरच्या सामन्यात भारतीय संघाने षटकाचा वेग संथ राखल्यामुळे आयसीसीने सामन्याची २० टक्के फी दंड म्हणून भरण्यास सांगितली आहे. भारतीय संघ व्यवस्थापनाने या सामन्यात विराट कोहलीला विश्रांती देत संघाची धुरा रोहित शर्माकडे सोपवली. तेव्हा भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ३ बाद १६३ धावा केल्या. रोहित शर्मा ६० तर केएल राहुलच्या ४५ धावांच्या जोरावर भारताला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत मजल मारत आली.
भारताच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडची अवस्था ३ बाद १७ अशी झाली होती. तेव्हा रॉस टेलर आणि टिम सेफर्ट यांनी न्यूझीलंडचा डाव सावरला. दोघांनी अर्धशतकी खेळी केली. पण भारतीय गोलंदाज नवदीप सैनीने त्या दोघांना मोक्याच्या क्षणी माघारी धाडले. यामुळे भारताचा विजय अवाक्यात आला. शेवटच्या षटकात शार्दुल ठाकुरने १३ धावा दिल्या आणि भारताने हा सामना ७ धावांनी जिंकला.
आयसीसीने या सामन्यानंतर भारतीय संघावर दंडात्मक कारवाई केली. षटकांचा वेग संथ राखल्यामुळे आयसीसीने भारतीय संघाला मॅच फीपैकी २० टक्के रक्कम दंड म्हणून भरण्यास सांगितली आहे. दरम्यान, याआधीच्या चौथ्या सामन्यातही भारतीय संघाला दंड ठोठावण्यात आला होता. त्या सामन्यातही भारतीय संघाने षटकाची गती संथ राखल्याने, ४० टक्के रक्कमेचा दंड झाला होता.
ICC T-२० Ranking : राहुलने विराट, रोहितला टाकले मागे, बुमराह 'या' स्थानावर
पाक क्रिकेटपटूने सोडली लाज, फिटनेस टेस्ट नापास झाल्याने ट्रेनरसमोरच काढले सगळे कपडे