मुंबई - भारत आणि इंग्लंड यांच्यात चेन्नईमध्ये खेळला गेलेला पहिला कसोटी सामना पाहुण्या संघाने २२७ धावांनी जिंकला आणि चार सामन्याच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली. या सामन्यात अनुभवी फिरकीपटू कुलदीप यादव ऐवजी नवख्या शाहबाज नदीमला अंतिम संघात स्थान देण्यात आले. यानंतर भारतीय संघाच्या या रणणितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. याच विषयावरून कुलदीपचे प्रशिक्षक कपिल पांडे यांनी नाराजी व्यक्त करत, विराटसह भारतीय व्यवस्थापनावर गंभीर आरोप केले आहे.
एका क्रीडा संकेतस्थळाशी बोलताना कपिल पांडे म्हणाले की, 'कुलदीप सतत भारतीय संघासोबत प्रवास करत आहे. यात तो कठीण परिस्थितीचा सामना करत आहे. तरी देखील त्याला संधी देण्यात येत नाहीये. एक म्हण आहे की, घर की मुर्गी दाल बराबर. त्याला समजून घेण्यात येत नाहीये. त्याची मागील कामगिरीची दखल घेतली जात नाहीये. तसेच त्याला एक साधारण क्रिकेटर असल्यासारखी वागणूक दिली जात आहे.'
कुलदीपने जर एखाद्या सामन्यात निराशजनक कामगिरी केली तर त्याला लगेच बाहेर काढलं जातं. पण हीच बाब दुसऱ्या खेळाडूंबाबत होत नाही. त्यांना अनेक संधी दिल्या जातात. ज्या खेळाडूची तयारी नाही, अशा खेळाडूंचा समावेश संघात केला जातो. जो खेळाडू नियमित सराव करतो, अशा खेळाडूला संधी दिली जात नाही. कर्णधार आणि प्रशिक्षक यांची महानता कुठे आहे?, असा सवाल पांडे यांनी विचारला.
दरम्यान, पहिल्या कसोटीतील पराभवानंतर कर्णधार विराट कोहलीला, कुलदीपविषयी प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा त्याने, आम्ही योजनेनुसार खेळाडूंची निवड केल्याचे सांगितले.
हेही वाचा - श्रेयस अय्यरचा चहलच्या पत्नीसोबत भन्नाट डान्स; पाहा व्हिडिओ
हेही वाचा - विजय हजारे करंडक : कृणाल पांड्याकडे बडोदा संघाची धुरा