अहमदाबाद - भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यातील पराभवाचा वचपा काढला. नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये रंगलेल्या दुसऱ्या सामन्यात भारताने इंग्लंडचा ७ गडी राखून पराभव केला. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना भारतापुढे विजयासाठी १६५ धावांचे लक्ष्य ठेवले होते. कर्णधार विराट कोहली (नाबाद ७३) आणि पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या इशान किशन (५६) चे अर्धशतक, यांच्या खेळीच्या जोरावर भारताने हा सामना १७.५ षटकात ३ गड्याच्या मोबदल्यात जिंकला आणि पाच सामन्याच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली.
इंग्लंडने दिलेल्या १६५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरूवात खराब झाली. सलामीवीर के. एल राहुलला सॅम करनने भोपळाही फोडू दिला नाही. यानंतर इशान किशन आणि कर्णधार विराट कोहलीने दुसऱ्या गड्यासाठी ९४ धावांची भागिदारी करत विजयाचा पाया रचला. या दरम्यान, किशनने पदार्पणाच्या सामन्यात अर्धशतक झळकावले. त्याने ३२ चेंडूत ५ चौकार आणि ४ षटकारांसह ५६ धावांची खेळी केली.
आदिल रशिदने किशनला पायचित करत, तुफानी खेळी संपुष्टात आणली. यानंतर विराटने पंतला साथीला घेत भारताला विजयासमीप नेले. जॉर्डनला उंच फटका मारण्याच्या नादात पंत झेलबाद झाला. त्याने १३ चेंडूत २ चौकार आणि २ षटकारासह २६ धावांची खेळी केली. विराटने ४९ चेंडूत ५ चौकार आणि ३ षटकारांसह नाबाद ७३ धावांची खेळी साकारली. तर श्रेयस ८ धावांवर नाबाद राहिला. इंग्लंडकडून सॅम करन आदिल रशिद आणि ख्रिस जॉर्डनने प्रत्येकी १-१ गडी बाद केला.
तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडची सुरूवात खराब झाली. भुवनेश्वर कुमारने डावाच्या पहिल्याच षटकात जोस बटलरला (०) पायचित करत पाहुण्या संघाला पहिला झटका दिला. त्यानंतर जेसन रॉय आणि डेविड मलान या दोघांनी दुसऱ्या गड्यासाठी ६३ धावांची भागिदारी करत डाव सावरला. इंग्लंडची धावसंख्या ६४ असताना युझर्वेंद्र चहलने आठव्या षटकात डेव्हिड मलानला (२४) पायचित करत ही जोडी फोडली. यानंतर जेसन रॉयचा अडथळा वॉशिग्टन सुंदरने दूर केला. त्याने रॉयला भुवनेश्वर कुमारकडे झेल देण्यास भाग पाडले. रॉयने ३५ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारासह ४६ धावा केल्या.
रॉय बाद झाल्यानंतर जॉनी बेअरस्टो आणि कर्णधार इयॉन मॉर्गन जोडीने फटकेबाजी करण्यास सुरूवात केली. या दोघांनी इंग्लंडला शंभरी पार करून दिली. तेव्हा वॉशिग्टन सुंदरने (२०) बेअरस्टोला सुर्यकुमार यादवकडे झेल देण्यास भाग पाडले. यानंतर शार्दुलच्या स्लोवनवर मॉर्गन (२८) चुकला. तो पंतकडे झेल देऊन बसला. शार्दुल ठाकूरने टाकलेल्या २० षटकात बेन स्टोक्सचा (२४) झेल हार्दिक पांड्याने घेतला. इंग्लंडचा सहावा गडी एकूण धावसंख्या १६० असताना तंबूत परतला. यानंतर सॅम करन (६) व ख्रिस जॉर्डन (०) हे नाबाद राहिले. भारताकडून सुंदर आणि शार्दुलने प्रत्येकी २-२ गडी बाद केले. तर भुवी, चहलने प्रत्येकी १-१ गडी टिपला.
हेही वाचा - VHT २०२१ Final : मुंबईचा विजय हजारे करंडकावर कब्जा, अंतिम सामन्यात यूपीचा उडवला धुव्वा
हेही वाचा - IPL गाजवणाऱ्या सूर्यकुमार यादव आणि इशान किशनचे टी-२० पदार्पण