इंदूर - इंदूरच्या होळकर मैदानावर रंगलेल्या बांगलादेशविरूद्धच्या पहिल्या कसोटीत टीम इंडियाने दणक्यात विजय मिळवला. पहिल्या आणि दुसऱ्या डावात भारतीय गोलंदाजांनी केलेल्या तिखट माऱ्यामुळे भारताला १ डाव आणि १३० धांवांनी हा विजय साध्य करता आला. बांगलादेशचा अनुभवी फलंदाज मुश्फिकुर रहीमने ६४ धावांची चिवट खेळी केली खरी, मात्र दुसऱ्या बाजूला योग्य साथ न मिळाल्याने तो संघाचा पराभव टाळण्यात अपयशी ठरला.
हेही वाचा - IPL लिलावापूर्वी 'असे' आहेत संपूर्ण संघ, कोणत्या संघात कोणता खेळाडू वाचा एका क्लिकवर...
बांगलादेशचा पहिला डाव १५० धावांवर आटोपल्यानंतर दुसऱ्या दिवसअखेर भारताने ६ बाद ४९३ धावांपर्यंत मजल मारली आणि पहिला डाव घोषित केला. भारताने एकूण ३४३ धावांची आघाडी मिळवल्यानंतर बांगलादेशला फलंदाजीसाठी पाचारण केले. दुसऱ्या डावातही बांगलादेशच्या फलंदाजांनी हाराकिरी पत्करली. उपाहारापर्यंत त्यांची ६० धावांत ४ गडी बाद अशी अवस्था झाली होती. आघाडीचे फलंदाज शादमन इस्लाम, इमरूल कयास, कर्णधार मोमिनुल हक आणि मोहम्मद मिथून चौघेही स्वस्तात माघारी परतले. तिसऱ्या दिवशी भारतीय संघ आज चहापानापर्यंत विजय मिळवेल, असे भाकित काही जणांनी केले होते. पण भारताच्या विजयात बांगलादेशचा मुश्फिकुर रहिम अडथळा ठरला.
रहीमला चार धावांवर असताना जीवदान मिळाले होते. मोहम्मद शमीच्या १७ व्या षटकात दुसऱ्या स्लीपमध्ये रोहितने रहीमचा झेल सोडला. त्याचा फायदा घेत रहिमने भारतीय गोलंदाजांचा धैर्याने सामना केला. रहीमने आपल्या खेळीत ७ चौकर लगावले. त्याला मेहंदी हसनने नाबाद ३८ धावांची खेळी साकारत चांगली साथ दिली. या दोघांनी सातव्या विकेटसाठी ५६ धावांची भागीदारी रचली. मेहंदी हसन बाद झाल्यानंतर, बांगलादेशचे उरलेले फलंदाज तग धरू शकले नाहीत. बांगलादेशचा दुसरा डाव २१३ धावांवर आटोपला. भारताकडून मोहम्मद शमीने ४, अश्विनने ३, उमेश यादवने २ आणि इशांत शर्माने १ बळी घेतला आहे.
तत्पूर्वी, बांगलादेश संघाचा कर्णधार मोमीनूल याने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. बांगलादेशचा पहिला डाव १५० धावांवर आटोपल्यानंतर भारताचा सलामीवीर मयांक अग्रवालने ३० चेंडूंत २८ चौकार आणि ८ षटकारांसह २४३ धावा केल्या. मयांकला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.