इंदूर - भारतीय संघाने बांगलादेश विरुध्दची टी-२० मालिका २-१ ने जिंकली. मालिकेनंतर भारतीय संघ आता कसोटी मालिकेसाठी सज्ज झाला आहे. उभय संघात पहिला कसोटी सामना इंदूरच्या होळकर मैदानात रंगणार आहे. यासामन्याआधी कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेनं पत्रकाराशी संवाद साधला. कसोटी संघात स्थान टिकवणाऱ्या अजिंक्यला लयीत नसल्याने एकदिवसीय संघात स्थान मिळेलेले नाही. याविषयी पत्रकारांनी विचारले असता, मी एकदिवसीय संघात नक्कीच पुनरागमन करेन, असं अजिंक्य म्हटलं आहे.
पत्रकारांशी संवाद साधताना अजिंक्य म्हणाला, 'मला कसोटी सामन्यात चांगला खेळ करायचा आहे. मला माझ्यावर संपूर्ण विश्वास असून मी चांगला खेळ करेन. तसेच याच जोरावर मी एकदिवसीय संघातही पुनरागमन करेन.'
दरम्यान, अजिंक्य रहाणेने २०१६ मध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध अखेरचा टी-२० सामना खेळला होता. एकदिवसीय सामन्याबद्दल सांगायचे झाल्यास, अजिंक्यने २०१८ मध्ये अखेरचा सामना खेळला होता. यानंतर तो मागील वर्षभरापासून भारताच्या एकदिवसीय संघात स्थान मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. टी-२० आणि एकदिवसीय संघात अंजिक्यला स्थान मिळालेले नसले तरी, त्यानं कसोटी संघात आपलं स्थान कायम राखलं आहे.
स्वत:वर तुमचा किती विश्वास आहे यावर सर्व बाबी अवलंबून असतात. तुम्हाला वर्तमानात राहता यायला हवे. कसोटीत माझी कामगिरी उंचावली आणि संघाच्या विजयात त्याचा वाटा असेल तर एकदिवसीय संघात पुनरागमन नक्की करेन, असेही अजिंक्य म्हणाला. दरम्यान, भारत-बांगलादेश संघातील पहिला कसोटी सामना १४ ते १८ नोव्हेंबर यादरम्यान रंगणार आहे.
हेही वाचा - हिटमॅनची 'ती' 'मॅरेथॉन' खेळी: एका जीवनदानानंतर ३३ चौकार व ९ षटकारांची आतिषी फटकेबाजी
हेही वाचा - टीम इंडिया इंदूरच्या होळकर स्टेडियमवर आहे अपराजित