मेलबर्न - भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात मेलबर्न येथे झालेला बॉक्सिंग डे कसोटी सामना पाहण्यासाठी आलेल्या एका प्रेक्षकाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. या चाहत्यामुळे स्टेडियमवर उपस्थित अन्य लोकांनाही कोरोनाची लागण झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमिवर तिसऱ्या कसोटी सामना पाहण्यासाठी येणाऱ्या प्रेक्षकांना मास्कची सक्ती करण्यात आली आहे.
बॉक्सिंग डे कसोटीसाठी स्टेडियमवर ३० हजार प्रेक्षक उपस्थित होते. तेव्हा मैदानावर येण्यापूर्वी त्या प्रेक्षकामध्ये कोरोनाची लक्षणे नव्हती. पण, कसोटीच्या दुसऱ्या दिवशी त्याचा कोरोना झालेल्या रुग्णाशी संपर्क आला असेल. नक्की ही लागण कशी झाली, याचा तपास सुरू आहे. बॉक्सिंग डे सामन्यासाठी ग्रेट साऊदर्न स्टँड झोन ५ मध्ये असलेल्या प्रेक्षकांनी स्वतःची कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, उभय संघातला तिसरा कसोटी सामना गुरुवारपासून सिडनी क्रिकेट मैदानावर होणार आहे. हा सामना पाहण्यासाठी येणाऱ्या सर्व प्रेक्षकांना मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच सिडनी क्रिकेट मैदानावर फक्त २५ टक्के प्रेक्षकांनाच प्रवेश दिला जाणार आहे. सिडनी मैदानाची प्रेक्षकक्षमता ४८ हजार आहे पण, फक्त १० हजार प्रेक्षकांनाच प्रवेश दिला जाणार आहे.
उभय संघात चार सामन्याची कसोटी मालिका खेळवली जात आहे. यातील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने तर दुसरा सामना भारतीय संघाने जिंकत मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे.
हेही वाचा - NZ vs PAK: न्यूझीलंडकडून पाकिस्तानचा डावाने पराभव; मालिकेत २-० ने निर्भेळ यश
हेही वाचा - कसोटी संघाची जर्सी परिधान करणे अभिमानास्पद, पुढील आव्हानासाठी तयार; नटराजनचे ट्विट