लंडन - कोरोना या महाभयंकर संकटाला दूर लोटण्यासाठी संपूर्ण विश्व एकत्र आले आहे. या आजाराविरूद्ध लढाईसाठी अनेक संस्था पुढाकार घेत आहेत. दरम्यान, काउंटी क्रिकेट क्लब वारविक्शायरनेही आपला पुढाकार दर्शवला आहे. इंग्लंडमधील क्रिकेटचे मैदान असलेले एजबॅस्टन स्टेडियम आता कोरोना व्हायरसचे तपासणी केंद्र होणार आहे. वारविक्शायरने हे मैदान सरकारच्या ताब्यात सोपवले असून लवकरच पुढची प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे.
एका वृतसंस्थेच्या माहितीनुसार, राष्ट्रीय आरोग्य सेवा (एनएचएस) येथे कार्यरत असलेले वैद्यकीय कर्मचारी या स्टेडियमच्या मुख्य कार पार्किंगची जागा कोरोनाची चाचणी घेण्यासाठी वापरतील. ज्यांना चाचणी घ्यायची आहे, ते एजबॅस्टन रोडवरून थेट प्रवेश करू शकतात आणि गाडीने आत जाऊ शकतात. त्यानंतर ते पर्शोर रोडकडून बाहेर बाहेर येऊ शकतात.
क्लबचे मुख्य कार्यकारी नील स्नोबॉल म्हणाले, "आमचे काउंटी क्रिकेट कार्यक्रम, परिषद आणि स्पर्धा २९ मेपर्यंत बंद आहेत. या कठीण परिस्थितीत आमच्या स्थानिक समुदायाला मदत करण्यासाठी आमचे कर्मचारी वेगवेगळ्या मार्गांचा शोध घेत आहेत."