कोलकाता - क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगाल (सीएबी)मध्ये एक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. त्यामुळे सीएबीचे कार्यालय एका आठवड्यासाठी बंद करण्यात आले. हा कर्मचारी सीएबीच्या सिव्हिल इंजिनिअरिंग विभागात कार्यरत आहे.
या व्यक्तीला सध्या कोलकाता येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शनिवारी या कर्मचाऱ्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. या प्रकरणानंतर, आता पुढील एक आठवड्यासाठी कार्यालय बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कालावधीत अधिकारी व कर्मचार्यांना घरून काम करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
कार्यालय येत्या 7 दिवसांसाठी बंद राहणार असून कॅम्पसमध्ये स्वच्छताविषयक काम सुरूच राहणार आहे, असे कॅबने सांगितले. अडीच महिन्यांच्या लॉकडाऊननंतर, अलीकडेच सीएबीमध्ये कमी कर्मचार्यांसह आठवड्यातून काही दिवस हळूहळू काम सुरू केले गेले होते.
आतापर्यंत पश्चिम बंगालमध्ये कोरोनाव्हायरसच्या 20,000हून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी 13, 000हून अधिक लोक बरे झाले आहेत. आता राज्यात कोरोनाची 6,200 सक्रिय प्रकरणे आहेत. तर, आतापर्यंत येथे 717 लोकांचा मृत्यू झाला आहे.