मुंबई - कोरोना विषाणूच्या फैलावामुळे २९ मार्चपासून सुरू होणारी इंडियन प्रीमिअर स्पर्धा १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली. पण भारतातील सध्याची परिस्थिती पाहता १५ एप्रिलपासून आयपीएल सुरू होईल, अशी शक्यता वाटत नाही. अशात आयपीएलची तारीख पुढे ढकलून ही स्पर्धा जुलै ते सप्टेंबर या कालावधीमध्ये आयोजित करण्यात येऊ शकते.
बीसीसीआय १५ एप्रिलपासून आयपीएल सुरू करण्याबाबत ठाम दिसत आहे. तसेच सामन्यांची संख्या कमी करण्यासही बीसीसीआय तयार नाही. जर आपण आयसीसीचे क्रिकेट कॅलेंडर पहिल्यास जुलै ते सप्टेंबर या महिन्यात आयपीएलचे आयोजन शक्य आहे.
पण, या काळात पाकिस्तान आशिया चषक टी-२० चे आयोजन युएईमध्ये करणार आहे. याशिवाय या काळात पाकिस्तानचा संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. इंग्लंड आणि पाकिस्तान वगळता ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडीज, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान हे संघ अधिक व्यस्त नाहीत. यामुळे ही स्पर्धा या काळात भरवली जाऊ शकते.
टोकियो ऑलिम्पिक -
बीसीसीआयकडून आयपीएल जुलै ते सप्टेंबर या कालावधीत आयोजित केली जाण्याची शक्यता आहे. पण याचवेळी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेला सुरुवात होणार आहे.
बीसीसीआयच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आयपीएल स्पर्धेचे अर्धे सामने दुसऱ्या देशात खेळवण्यात येतील. दरम्यान, याआधी २००९ मध्ये आयपीएल स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत खेळवण्यात आले होते. तेव्हा 37 दिवसात ही स्पर्धा संपली होती.
हेही वाचा - Corona Virus : भारतातून मायदेशी परतले आफ्रिकन खेळाडू; १४ दिवस जाणार एकांतवासात
हेही वाचा - COVID 19 : IPL खेळायचे असल्यास स्वत:च्या 'रिस्क'वर खेळा, ऑस्ट्रेलिया सरकारने हात झटकले