नवी दिल्ली - भारताचा अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजाराला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठा धक्का बसला आहे. कोरोनामुळे इंग्लंड क्रिकेट काउंटी स्पर्धेतील ग्लॉस्टरशायर संघाने पुजाराशी केलेला करार रद्द केला आहे. पुजाराला काउंटी क्रिकेटमध्ये सहा चॅम्पियनशिप सामने खेळावे लागणार होते.
पुजाराचा ग्लॉस्टरशायरशी त्याचा १२ एप्रिल ते २२ मे दरम्यान करार होता. २०२० च्या हंगामात आम्हाला चेतेश्वर पुजाराची शानदार फलंदाजी पाहता येणार नाही. तुम्हाला माहिती आहे की मे २०२० पर्यंत कोणतीही क्रिकेटची स्पर्धा आयोजित केलेले नाही, असे क्लबने निवेदनात म्हटले आहे.
पुजारा यापूर्वी इंग्लंडमधील डर्बीशायर, यॉर्कशायर आणि नॉटिंगहॅमशायरकडून खेळला आहे. दरम्यान, पुजाराने कोरोना व्हायरसविरूद्धच्या लढ्यात योगदान दिले आहे. पुजाराने पंतप्रधान सहायता निधीत मदत देण्याचे जाहीर केले. त्याने ट्विटरवरून ही माहिती दिली.