दुबई - आयपीएल फ्रेंचायझी चेन्नई सुपर किंग्जच्या (सीएसके) अडचणीत भर पडली आहे. १२ सदस्यांच्या कोरोना प्रकरणानंतर संघाचा अजून एक खेळाडू कोरोनाच्या कचाट्यात सापडला आहे. महाराष्ट्राचा खेळाडू आणि सीएसकेचा फलंदाज ऋतुराज गायकवाड कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे.
आयपीएलला काही दिवस उरले असताना संघाचा वेगवान गोलंदाज दीपक चहरच्या कोरोना पॉझिटिव्हची बातमी समोर आली होती. त्यानंतर अनुभवी फलंदाज सुरेश रैनाने वैयक्तिक कारणामुळे यंदाच्या आयपीएलमधून माघार घेतली. चेन्नईच्या छावणीत कोरोनाची प्रकरणे वाढल्यामुळे आयपीएलच्या यंदाच्या हंगामावर संशय व्यक्त करण्यात येत आहे.
यंदा आयपीएलचे तेरावे पर्व १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत यूएईत रंगणार आहे. यूएईमध्ये जाण्यापूर्वी सीएसकेने चेन्नई येथे पाच दिवसांचे प्रशिक्षण ठेवले होते. यामध्ये एम.एस.धोनी, सुरेश रैना, दीपक चहर, अंबाती रायडू, पीयूष चावला आणि शार्दुल ठाकूर यांनी सहभाग घेतला होता. दुबईला दाखल झालेल्या इतर संघांच्या प्रशिक्षणाला सुरुवात झाली आहे. मात्र, चेन्नई सुपर किंग्ज अद्यापही प्रशिक्षणाच्या प्रतीक्षेत आहे.