हैदराबाद - जेव्हा धावसंख्येचा पाठलाग करून सामना जिंकण्याची वेळ येते तेव्हा सचिन तेंडुलकरपेक्षाही विराट कोहली जास्त सरस आहे, असे वक्तव्य इंग्लंडचा माजी फलंदाज केविन पीटरसन याने केले होते. त्यानंतर आता ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकी गोलंदाज ब्रॅड हॉग यानेही कोहलीचे कौतुक केले आहे. धावसंख्येचा पाठलाग पूर्ण करण्याची क्षमता रोहित शर्मापेक्षा विराट कोहलीमध्ये जास्त आहे. मात्र, कोहली आणि शर्मा यांची भूमिका संघासाठी वेगवेगळी आणि सारखीच महत्त्वाची आहे, त्यामुळे त्यांची तुलना होऊ शकत नाही, असेही हॉगने स्पष्ट केले.
हॉगच्या युट्यूब चॅनेलवर एका प्रश्नाला उत्तर देताना हॉगने कोहलीचे कौतुक केले. जेव्हा भारतीय संघावर धावसंख्येचा पाठलाग करण्याची वेळ येते तेव्हा कोहलीचा खेळ जास्त आक्रमक होतो. संघाच्या विजयामध्ये त्याचे योगदान नक्कीच असते. तणावमुक्त होऊन खेळण्याची क्षमता कोहलीकडे आहे. मात्र, यामुळे विराट कोहली आणि रोहित शर्मा यांची तुलना होऊ शकत नाही. नवीन चेंडूवर धावा जमा करण्यात रोहितचा हात कोणीही धरू शकत नाही, असे हॉग म्हणाला.
हॉगच्या अगोदर श्रीलंकेचा माजी फलंदाज कुमार संगकार यानेही कोहली आणि शर्माची स्तुती केली होती. त्या दोघांनी एकदिवसीय सामन्यात धावा जमा करण्याचे नियमच बदलून टाकले आहेत. कोहली आणि शर्मा ही आधुनिक क्रिकेटमधील एक सर्वोत्तम जोडी आहे, असा उल्लेख संगकाराने केला होता.