नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय)ने आज मंगळवारी टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षक आणि सहाय्यक स्टाफसाठी नव्याने अर्ज मागवले आहेत. यामध्ये बीसीसीआयने विधिध अटी नमूद केल्या आहेत. बीसीसीआयने मुख्य प्रशिक्षक, फलंदाजी प्रशिक्षक, गोलंदाजी प्रशिक्षक, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक, फिजिओ, स्ट्रेन्थ अँड कंडिशनिंग प्रशिक्षक आणि प्रशासकीय व्यवस्थापक या जागांसाठी अर्ज मागवले आहेत.
पीटीआय या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, मुख्य प्रशिक्षक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 60 पेक्षा कमी असावे आणि तो उमेदवार किमान 2 वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला असावा, अशी अट ठेवण्यात आली आहे.
मुख्य प्रशिक्षक पदासाठी बीसीसीआयने ठेवलेल्या मुख्य अटी -
- अर्जदार किमान 2 वर्षांसाठी एखाद्या कसोटी दर्जा प्राप्त संघाचे प्रशिक्षकपद भूषवलेला असावा.
- आयसीसीशी संलग्न सदस्य संघ किंवा आयपीएल संघाचे 3 वर्ष प्रशिक्षकपद सांभाळण्याचा अनुभव असावा.
- अर्जदाराला 30 कसोटी सामने किंवा 50 एकदिवसीय सामने खेळण्याचा अनुभव असावा.
इतर पदांसाठी वेगवेगळ्या अटी बीसीसीआयने ठेवल्या आहेत. दरम्यान, 30 जुलै संध्याकाळी 5 वाजेपर्यंत इच्छुक उमेदवारांना अर्ज भरण्याची मुदत देण्यात आली आहे.