सिडनी - भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तिसरा कसोटी सामना सिडनीमध्ये खेळला जात आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टिम पेन या सामन्यात पंचाच्या निर्णयावर नाराज झाला आणि त्याने पंचाशी हुज्जत घालत अपशब्द वापरले.
घडले असे की, तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रामध्ये भारताची अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा ही जोडी मैदानात होती. तेव्हा पॅट कमिन्सने अजिंक्य रहाणेला (२२) त्रिफळाचीत केले. त्यानंतर चेतेश्वर पुजारासाठी शॉर्ट लेगवर कॅचची अपिल करण्यात आली. या निर्णयावर टिम पेनने १५ सेंकदाची वेळ संपल्यानंतर डीआरएस घेतला. विशेष म्हणजे, पंचांनी तो मान्य देखील केला. चेंडू बॅटला लागल्याचा कोणताचा पुरावा हॉटस्पॉट किंवा स्निको मीटरमधून दिसून आला नाही. यामुळे पंचांनी पुजाराला नाबाद ठरवले. पंचाच्या या निर्णयावर टिम पेन नाराज झाला. त्याने पंचाशी हुज्जत घालत अपशब्द वापरले.
दरम्यान, मेलबर्न कसोटीत पेनला स्निकोच्या पुराव्याच्या आधारावर बाद ठरण्यात आले होते. हाच धागा पकडत पेनने पंचांची हुज्जत घातली. त्यावर हा निर्णय मी नाही, तर तिसऱ्या पंचांनी दिला आहे, असे मैदानातील पंचांनी त्याला सांगितले. त्यानंतर चिडलेल्या पेनने अपशब्द वापरले. त्याचे हे वर्तन सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
एका क्रीडा वृत्तवाहिनीसाठी कॉमेंट्री करणाऱ्या मार्क वॉने पेनची बाजू घेतली. पेनला याच नियमानुसार बाद देण्यात आले, तर मग पुजारा का नाही, असा सवाल त्याने उपस्थित केला. यात पेनचे काही चुकले नाही, असे सांगत वॉने पेनच्या कृत्याचे समर्थन केले. पण त्याचा सह कॉमेंटेटर ब्रेंडन ज्युलियन त्याच्या मताशी सहमत झाला नाही.