नवी दिल्ली : बांगलादेशच्या क्रिकेट संघाने इंग्लंडविरुद्ध इतिहास रचला आहे. त्यांनी पहिल्यांदाच वर्ल्ड चॅम्पियन इंग्लंडचा टी - 20 मालिकेत 3-0 ने क्लीन स्वीप केला आहे. मीरपूर येथे खेळल्या गेलेल्या मालिकेतील शेवटच्या सामन्यात बांगलादेशने इंग्लंडचा 16 धावांनी पराभव केला. या आधी १२ मार्चला मीरपूरमध्येच खेळल्या गेलेल्या सामन्यात बांगलादेशने इंग्लंडचा ४ गडी राखून पराभव करत मालिकेत २-० अशी अभेद्य आघाडी घेतली होती.
बांगलादेशची प्रथम फलंदाजी : सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बांगलादेश संघाने 20 षटकांत 2 गडी गमावून 158 धावा केल्या. फलंदाज लिटन कुमार दासने 57 चेंडूत 73 आणि नजमुल हुसेन शांतोने 36 चेंडूत नाबाद 47 धावा केल्या. त्याचवेळी रॉनी तालुकदारने 22 चेंडूत 24 आणि कर्णधार शाकिब अल हसनने 6 चेंडूत नाबाद 4 धावा केल्या. इंग्लंडकडून आदिल रशीद आणि ख्रिस जॉर्डनने प्रत्येकी एक विकेट घेतली.
धावांचा पाठलाग करण्यात इंग्लंडला अपयश : प्रत्युतरात 159 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ 20 षटकांत 6 विकेट गमावून केवळ 142 धावाच करू शकला. अशाप्रकारे बांगलादेशने हा सामना 16 धावांनी जिंकला. इंग्लंड संघाकडून डेव्हिड मलानने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 47 चेंडूत 53 धावांची खेळी केली. तर कर्णधार जोस बटलरने 31 चेंडूत 40 धावा केल्या. ख्रिस वोक्सने 10 चेंडूत नाबाद 13 आणि बेन डकेटने 11 चेंडूत 11 धावा केल्या. बांगलादेशकडून तस्किन अहमदने 2 तर तनवीर इस्लाम, शाकिब अल हसन आणि मुस्तफिरझूर रहमान यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
मालिकेत 3-0 ने क्लिन स्विप : मालिकेतील दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने 20 षटकात 117 धावा केल्या होत्या. प्रत्युतरात बांगलादेशने 18.5 षटकांत 6 गडी गमावून 120 धावा करत सामना जिंकला होता. मालिकेतील पहिला सामना 9 मार्च रोजी चट्टोग्राममध्ये खेळला गेला होता. या सामन्यात बांगलादेशने इंग्लंडचा 6 विकेट्सने पराभव केला होता. सामन्यात प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने 20 षटकात 6 गडी गमावून 156 धावा केल्या. प्रत्युत्तरात बांगलादेशने 18 षटकांत 157 धावा करत विजय मिळवला.
हेही वाचा : Virat Kohli Dance : क्विक स्टाइल गँगसोबत विराटचा डान्स, पाहा व्हिडिओ