मुंबई - राज्य सरकारने लॉकडाऊनच्या अटी शिथिल करताना मुंबईसह राज्यभर शूटिंग करण्यासाठी परवानगी दिलेली असली तरीही प्रत्यक्ष शूटिंग सुरू व्हायला 20 जून उजाडण्याची शक्यता आहे. सिनेसृष्टीत काम करणाऱ्या फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज असोसिएशनचे अध्यक्ष बी. एन. तिवारी यांनी ही बाब स्पष्ट केली आहे.
राज्य सरकारने फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांशी बोलताना त्यांना एक नियमावली तयार करायला सांगितली होती. त्यानुसार फेडरेशन, प्रोड्युसर गिल्ड आणि सिंटा यांनी एकत्र बसून नियमावली तयार केली होती. ही नियमावली राज्य सरकारला सादर केल्यानंतर त्यांनी शूटिंगसाठी परवानगी दिली असली तरीही प्रत्यक्ष शूट सुरू करण्यापूर्वी राज्य सरकारकडे रितसर अर्ज करण्याची अट घातली आहे. यानुसार ओटीटी प्लॅटफॉर्मवरील मालिकेसाठी निर्मात्यांनी, तर टीव्ही मालिका शूटिंगसाठी संबधित वाहिनीने राज्य सरकारकडे अर्ज करायचा आहे. सरकारने जारी केलेल्या आदेशात 5 जूनपासून चित्रीकरण करण्याची मुभा देण्यात येणार असली, तरीही या परवानग्या मिळून प्रत्यक्ष शूटिंग सुरू व्हायला किमान 20 जूनची तारीख उजाडेल, अशी शक्यता फेडरेशनकडून व्यक्त करण्यात आली आहे.
शूटिंगसाठी नवीन नियम कोणते -
1) 65 वर्षाहून जास्त वयाच्या कामगाराला शूटिंग सेटवर काम करण्याची परवानगी नसेल.
2) गरोदर महिला आणि कलाकारांची पत्नी मुलं यांना सेटवर आणायची परवानगी नसेल.
3) प्रत्येक सिनेमा अथवा मालिकेच्या सेटवर डॉक्टर आणि परिचारिका तसच ऍम्ब्युलन्स उपलब्ध असेल.
) सेटवर कलाकार आणि तंत्रज्ञ याना एकमेकांना हँडशेक किंवा किस करण्याची अथवा गळाभेट घेण्याची परवानगी नसेल.
5) कामगार आणि कलाकार यांचं थर्मल स्कॅनिंग करून चित्रीकरण सुरू करण्याआधी त्यांची कोविड टेस्ट निगेटिव्ह आली तरच त्यांना प्रत्यक्ष शुटिंग सुरू करता येईल.
6) एकूण युनिटच्या फक्त 33 टक्के कामगारांना घेऊन शुटिंग करण्याची मुभा असेल. कमीत कमी लोकाना घेऊन शुटिंग करावे लागेल.
गोरेगाव फिल्मसिटीत शूटिंग कधी ?
कोरोनाची साथ पसरल्यापासून लॉकडाऊन जाहीर झाल्यामुळे गोरेगाव चित्रनगरीमधील शूटिंग पूर्णपणे बंद आहे. सध्या करण जोहरच्या बिगबजेट तख्त या सिनेमाचा सेट चित्रनगरीमध्ये उभारण्याच काम सुरू होतं. याशिवाय रणबीर कपूर, आलीया भटच्या ब्रम्हास्त्रच शूटिंग सुरूच होतं. याशिवाय 'नजर 2', 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर', बाळूमामाच्या नावानं चांगभलं, स्वराज्यजननी जिजामाता आशा काही मराठी हिंदी मालिकांचे शूटिंग तिथे सुरू होते. मात्र, आता लवकरच या मालिका आणि चित्रपट यांचं चित्रीकरण पुन्हा सुरू होईल. मात्र, त्यासाठी सरकारी परवानगी मिळण्याची प्रक्रिया पूर्ण करावीच लागेल.