सध्या टेलिव्हिजन वाहिन्यांवर नव्या मालिकांचे पीक आलेले दिसतेय. कोरोना संकटामुळे वर्ष-दीड वर्षांपासून बासनात गुंडाळून ठेवावे लागलेले प्रोजेक्ट्स आता धडाधड बाहेर येत आहेत. लॉकडाऊनमध्ये, शूटिंग बंद झाल्यावर लोकप्रिय मालिकेचे नवीन भाग दाखवू न शकल्याने प्रेक्षकांची तुटलेली नाळ पुन्हा जोडण्याची स्वप्ने पाहण्याचा हा प्रयत्न असावा. आपल्या सर्वांची काही स्वप्ने असतात आणि ती खरे होण्याची आपण वाट पहात असतो. पण जेव्हा एक संपूर्ण कुटुंब एका स्वप्नावर पिढ्यान् पिढ्या आरूढ असते आणि ती एके दिवशी पूर्ण व्हावे अशी त्यांची इच्छा असते तेव्हा काय होते?
पंजाब मधील प्रत्येक घरातील एखादीतरी व्यक्ती कॅनडाला जाऊन आलेली असते वा तिथली स्थानिक बनलेली असते. कॅनडामध्ये शीख समुदाय मोठ्या प्रमाणात स्थायिक असून आता तर अनेक नामवंत शीख त्या देशाच्या मंत्रिमंडळात मंत्री आहेत. कॅनडाला जाणे हे बहुधा प्रत्येक शीख व्यक्तीचे स्वप्नच असते जणू. आता याच विषयावर एक मालिका येऊ घातलीय.
कलर्स वाहिनी नवनव्या मालिका घेऊन येत असून त्यात भर पडलीय नव्याकोऱ्या मालिकेची. ‘उडारियाँ‘ असे नाव असलेली ही मालिका आशा, प्रेम, आवड आणि स्वप्नपूर्तीची एक कथा असून पंजाबच्या मध्यवर्ती भागात वास्तव करणाऱ्या संधु कुटुंबियांचा प्रवास अधोरेखित करणार आहे. त्यांचे एक स्वप्न आहे, कॅनडाला जाण्याचे. पण बरेच प्रयत्न करूनही त्यांच्या नशिबी ते पूर्ण होणे लिहिलेले नसते.
हेही वाचा - अनन्या पांडेचा हॉट अंदाज पाहिलात का?
त्यांचे अर्धवट राहिलेले स्वप्न आता ते त्यांच्या मुली जास्मिन आणि तेजोच्या रुपातून सत्यात उतरवू पहात आहेत. त्या ते स्वप्न पूर्ण होण्याच्या मार्गावर असताना अजून एक अडथळा येतो तो म्हणजे फतेह. बॉक्सर असलेल्या फतेहचे जस्मिनवर खूप प्रेम आहे पण त्यांच्या मार्गात दैव तेजोला आणते.
तेजो साकारणारी प्रियांका चहर म्हणाली, “माझा कलर्ससोबत हा पहिलाच शो आहे, आणि मेहनती टीम सोबत काम करण्यासाठी मी अतिशय उत्सुक झाले आहे. या शोची संकल्पना वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि अशा प्रकारच्या सुंदर भूमिकेतून पुढे येण्याचा मला आनंद झाला आहे. माझे पात्र तेजो ही खूप साधी व ठाम मुलगी आहे, माझे व्यक्तिमत्व तिच्यासारखेच असल्यामुळे मी तिच्याशी पूर्णपणे ‘रिलेट’ करू शकते.”
जास्मिनची भूमिका करणारी ईशा मालवीय तिच्या भूमिकेविषयी सांगताना म्हणाली, “मी या शोद्वारे मालिकाविश्वात पदार्पण करत आहे आणि कलर्स सोबत काम करण्यासाठी मी खूप उल्हसित झाले आहे. माझ्या पात्राचे कॅनडाला जाण्याचे स्वप्न वास्तविक अनेक पंजाबी लोकांचे असते व त्यामुळे माझ्या पात्राशी ते ‘रिलेट’ करू शकतील.”
हेही वाचा - संजय दत्त 'केजीएफ चॅप्टर: 2'च्या रिलीजसाठी उत्साहित