मुंबई - कोरोना व्हायरसच्या कहरानंतर देशाची बाजारपेठ ठप्प झाली आहे. व्हायरसपासून बचाव व्हावा म्हणून अनेक उपक्रम आणि व्यवसाय बंद आहेत. याचाच भाग म्हणून मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून सिनेमा आणि टीव्हीचे शूटिंग थांबली होती. अनेक नियम आणि अटींचे पालन करीत या शूटिंगला अखेर परवानगी मिळाली आहे. मोठ्या अंतरानंतर टीव्ही मालिकांचे शूटिंग सुरू होत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार २२ जूनपासून टीव्ही मालिकांचे शूटिंग सुरू होणार आहेत. जुलै महिन्यापासून प्रेक्षकांना आपल्या आवडत्या मालिकांचे एपिसोड्स पुन्हा दिसणार आहेत. यामध्ये 'गुड्डन तुम से ना हो पाएगा', 'कुमकुम भाग्य', 'कुंडली भाग्य', 'तुझसे है राबता, यासारख्या मालिकांचे नवीन एपिसोड्स प्रेक्षकांना पाहता येणार आहेत.
हेही वाचा - सुशांत सिंहच्या अस्थींचे शोकाकूल वातावरणात झाले गंगेमध्ये विसर्जन...
कोरोनाचा प्रभाव असल्यामुळे शूटिंगची पध्दत बदलण्यात आली आहे. जास्त लोकांच्या उपस्थितीत शूटिंग होऊ शकणार नाहीत. सरकराने अनेक गाईडलाइन्स ठरवून दिल्या आहेत. यानुसार २ मिटरचे अंतर राखणे आवश्यक आहे, हात मिळवण्यावर बंदी आहे, एकत्र जेवण करण्यासही परवानगी नाही. त्यामुळे लग्नाचे सीन्स पाहायला मिळणार नाहीत. त्यामुळे शूटिंगचे स्वरुप आणि मालिकातून दिसणारे प्रसंग पहिल्याहून वेगळे असतील.
असे असले तरी गेल्या काही महिन्यापासून तेच तेच जुने एपिसोड पाहून कंटाळलेल्या प्रेक्षकांना हा नवा बदलही मान्य होण्यासारखा आहे.